– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन
नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत.
आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत.
अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत.
या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *