कर्मचाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे पश्चिम येथील ओम श्री स्वामी समर्थ सोसायटीतील रहिवासी जगदीश कमलसिंह खैरालिया यांनी महावितरणाकडे लेखी तक्रार करून कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जगदीश खैरालिया यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण (ठाणे विभाग) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जुलै २०२६ रोजी वीजबिलाचा धनादेश भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कार्यालयात समजले की, त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून त्याजागी स्मार्ट मीटर बसविण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतीही पूर्वकल्पना, सूचना किंवा संमती घेण्यात आली नव्हती. ही बाब ग्राहक संरक्षणाच्या अधिकारांचे उल्लंघन असून ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खैरालिया यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या १ बीएचके सदनिकेत राहतात. घरात अत्यल्प वीज वापर होत असून टीव्ही, फ्रिज व वॉशिंग मशीनचा वापरही केला जात नाही. तरीदेखील स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर कार्यालयात चौकशी केली असता स्मार्ट मीटर बसविल्याची माहिती मिळाली. मात्र तो नेमका कधी बसविण्यात आला, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या निवेदनाद्वारे त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये तात्काळ स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुना वीज मीटर बसविणे, स्मार्ट मीटरमुळे वसूल झालेली अतिरिक्त रक्कम व्याजासह परत देणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई तसेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *