दोन पीडित महिलांची सुटका
अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ठाणे पश्चिम येथील हॉटेल रोहेलो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, शंभुजी हॉटेलजवळ, विजय गार्डन रोड, कावेसर येथे काही महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १६ जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत एका महिला दलालाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १४३(१), १४३(३) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील कांदिवली येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *