दिवा, दि 16 जुलै : बी.आर. नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर शाखेच्या वतीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे स्वच्छता, पाणी निचरा, भटके कुत्रे, धोकादायक झाडे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसह विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शाखा संघटिका श्रावणी संतोष कदम यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपविभागप्रमुख नितीन सावंत, शाखाप्रमुख शशिकांत कुंभारगण, राजकुमार गुप्ता तसेच उपशाखाप्रमुख संतोष दत्ताराम कदम उपस्थित होते.
निवेदनात परिसरातील गटारांची नियमित साफसफाई करून वेळेवर कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, धोकादायक झाडांची तातडीने छाटणी अथवा तोडणी करावी, गटारांमधील अडथळे दूर करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, बी.आर. नगरमधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवावे, नागरिकांच्या प्रलंबित वैयक्तिक तक्रारींचे तातडीने निराकरण करावे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित पदपथ, पुरेशी स्ट्रीट लाईट आणि बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्तांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. श्रावणी कदम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे बी.आर. नगर मधील नागरिकांच्या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *