Category: रायगड

raigad news and updates

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर मुकुंद रांजणे माथेरान: माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासकीय राजवटीत अधिकारी, कर्मचारी वेळ मिळेल त्याप्रमाणे हजर राहून कार्यालयीन कामकाज कसेतरी पहात होते. चार ते पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने त्यावेळी या कार्यालयावर येथील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे होते परंतु केवळ सभागृहात सदस्य पद नसल्याने प्रत्येकाचा अहंभाव आड येत होता. त्यामुळे गावातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजच्या घडीला नगरपरिषदेत सत्ताधारी गट स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सुद्धा तीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दुपारी बारा वाजले तरी कुणी अधिकारी अथवा कार्यालयीन कामकाज पाहणारा द्वितीय श्रेणीतील अधिकारी वर्ग हजर नसतात. ज्या काही मुली मानधनावर कार्यरत आहेत त्याच काहिनाकाही कामे करत आहेत. नागरिकांना घरभाडे भरावयाचे असल्यास अथवा अन्य काही कामे करून घ्यावयाची झाल्यास अधिकारी नसल्याने नागरिकांना भर उन्हातान्हात  फेऱ्या माराव्या लागत आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निदान यापुढे तरी अधिकारी वर्गावर अंकुश ठेवतील की नाही अन्यथा निश्चितच माथेरानचे भवितव्य अंधकारमय आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकदा अमुक अधिकारी अलिबागला मिटिंगला गेलेत तर कुणी मंत्रालयात गेलेत अशीही उत्तरे ऐकावयास मिळतात. या सर्व कामानिमित्त जाणाऱ्या अधिकारी वर्गाची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जात आहे की नाही, ही मंडळी खरोखरच मिटिंगच्या बहाण्याने कर्तव्य पार पाडतात की घरीच असतात असाही प्रश्न स्थानिकांमधुन विचारला जात आहे.

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचा विश्वास अलिबाग 🙁 अशोक गायकवाड )— ‘लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत’, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यव्यापी मोहिमेतून प्रशासनाचा कायापालट. यावेळी मार्गदर्शन करताना खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात (सर्कल) राबविला जात आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या शिबिरांचे नियोजन केले जाईल, जेणेकरून एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही. कार्यक्रमात बोलताना शिवाजी चौरे यांनी नमूद केले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हातात हात घालून काम करतात, तिथे विकासकामांचा वेग अधिक असतो. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून तो सर्व शासकीय विभागांना एकत्र बांधणारा समन्वय साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध दाखले, परवाने आणि शासकीय योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे आणि विनाविलंब मिळावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.’ या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला असून, प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक  उईके  यांचे प्रतिपादन अलिबाग : (अशोक गायकवाड — आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास हा त्या समाजाचा खरा आत्मा आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करणाऱ्या या समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक  उईके यांनी शनिवारी येथे केले. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासी विकास परिषद’ सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. पेण येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती. मंत्री डॉ.  उईके  पुढे म्हणाले की, “आदिवासी समाज अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि विश्वासू आहे. त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट वाड्या-वस्त्यांवर जाऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग हा या समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण झाला असून, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी, ठाकर आणि कातकरी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आदिवासी वाड्यांमधील मुले अत्यंत जिद्दी आणि कणखर असतात. ‘अमृता आहार’ योजनेच्या माध्यमातून आपण कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहोत. सुधागड-पाली तालुक्यात आदिवासी विभागाचे स्वतंत्र संकुल उभारण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत आहे.” भरत गोगावले यांनी शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची माहिती दिली. ते म्हणाले की, “आदिवासी विभागासाठी २१ हजार कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. दुर्गम भागातील वाड्यांना रस्ते, पाणी आणि सभागृह यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.” कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आदिवासी बांधवांनी लावलेल्या स्टॉल्सना भेट देऊन त्यांच्या हस्तकलेचे कौतुक केले. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना विविध योजनांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या परिषदेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पद्मश्री परशुराम गंगावणे, आदिवासी विकास विभाग चे अप्पर आयुक्त (ठाणे) गोपीचंद कदम आणि प्रकल्प अधिकारी  तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रास्ताविकात विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न रायगड- रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात देवघर गावात स्वयंभू श्री अमृतेश्वराचे प्राचीन, सुबक मंदिर आहे. नुकत्याच  होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ,ज्येष्ठ, महिला मंडळ आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) यांच्या सर्वांच्या सहकार्याने श्री अमृतेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने  संपन्न झाला.देवाचे परमभक्त व ग्रामस्थ संदेश महामुणकर व विराज महामुणकर सांगतात की, देवघर या गावाचा उंबरठा फक्त ३३ घरांचा आहे तरी  येथील प्रत्येक कार्यक्रम हा हौसेने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने  गावचे ग्रामस्थ, महिला तसेच तरुण मंडळी पार पाडत असतात.या कार्यक्रमाच्या दिवशी गावातील प्रत्येक ग्रामस्थ आणि मुंबईवरून आलेले चाकरमानी  आपल्या कामातून थोडी उसंत काढून या उत्सवात सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुद्धा ग्रामस्थ व महिला मंडळ देवघर आणि युवा तरुण मंडळ (मुंबई) हे एकत्रित येऊन करत असतात. हर हर महादेव व जय बोला जय बोला श्री अमृतेश्वर महाराज की जय या गजरात ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतात. सदर पालखी सोहळ्याला उपस्थित ग्रामस्थ, वरिष्ठ आणि महिला मंडळ, लहान मुले तसेच युवा तरुण मंडळ मुंबईचे उपस्थित कार्यकर्ते विराज महामुणकर, संदेश महामुणकर, संकेत महामुणकर, ऋषिकेश भुवड, सुरज महामुणकर, संकल्प सुर्वे,राहुल शिगवण, समिर भुवड, दीपेश कदम,नीरज महामुणकर, सोहम महामुणकर, धनराज विचारे,स्वप्निल भुवड,सौरभ कदम, विकेश कदम, सनराज शिर्के, अनिकेत शिर्के,अभिषेक महामुणकर,कुणाल शिंदे, शुभम शिर्के,साहिल शिर्के,संकेत महामुणकर, राज महामुणकर. (इंस्टाग्राम नियोजक कुशल महामुणकर व प्रज्वल महामुणकर. देवघर गावचा इंस्टाग्राम आयडी या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने रविवार दिनांक ०८ मार्च रोजी खांदा कॉलनी येथे रायगड…

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू…

क्ले पेव्हर ब्लॉकचे खड्डेमय रस्ते दुरुस्तीला सुरुवात

क्ले पेव्हर ब्लॉकचे खड्डेमय रस्ते दुरुस्तीला सुरुवात शिवाजी शिंदेंचा पुढाकार मुकुंद रांजणे माथेरान: माथेरान मधील बहुतेक ठिकाणी ठेकेदाराकडून लावण्यात आलेल्या निकृष्ट क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे त्यावरून पायी चालत जाणे पर्यटकांना त्रासदायक ठरत होते. विशेष म्हणजे या रस्त्यावरूनच सातत्याने ई रिक्षा धावते त्यावेळी खड्डेमय रस्त्यांमुळे या पर्यावरण पूरक वाहनाचे पाटे तुटण्याचे प्रमाण वाढले होते. ही खर्चिक बाब सर्वसामान्य ई रिक्षा चालकांना परवडणारी नव्हती. याकामी प्रभाग क्र. ३ मधील कस्तुरबा रोडवरील ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत त्या जागी चांगल्या दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. विद्यमान नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे यांच्या सूचनेनुसार ही महत्वपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. याच मार्गावरून नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षातून ने आण केली जाते त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग याच सेवेचा लाभ घेताना दिसतात. परंतु आजवर कोणत्याही अधिका-यांनी ई रिक्षाची मोफत सेवा प्राप्त करून देखील रस्ते सुस्थितीत असावे याबाबत चकार शब्द काढला नाही. किंवा त्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न सुध्दा केलेले नाहीत असे नागरिक बोलत आहेत. नगरसेवक शिवाजी शिंदे, नगरसेविका रिझवाना शेख यांच्या प्रयत्नामुळे या भागात उत्तम प्रकारे रस्ते केले जात आहेत. याप्रमाणे दस्तुरी वरून येताना अनेक भागात क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत ते सुद्धा लवकरच दुरुस्त करावेत.वखारी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज रोड पर्यंतचा अपूर्ण असणारा क्ले पेव्हर ब्लॉकचा रस्ता,गव्हाणकर शाळेपर्यंतचा रस्ता लवकरच बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि ई रिक्षा चालकांमधून होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांची उपस्थिती अशोक गायकवाड कर्जत : महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्जत उपविभागत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा-क्र. १ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत उपविभागातील कर्जत-खालापूर या दोन्ही तालुक्यांतील १२ मंडळ स्तरांवर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूलविषयक दैनंदिन अडचणींना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करून तक्रारींचे ऑन-द-स्पॉट निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. शिबिरांमधील प्रमुख सेवा पुढील प्रमाणे — प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निकाली काढणे , अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क , लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन, कलम ४२ मधील सुधारणा ,अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे, कलम ४२अ, ४२व, ४२क, ४२ड अंतर्गत संपुष्टात आलेल्या सनद प्रणालीबाबत मार्गदर्शन , एकवेळ अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था , भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे. व्यवसाय सुलभता अंतर्गत एक खिडकी व्यवस्था, ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण व पाणंद रस्ते विषयक सुविधा तुकडेबंद कायद्याविरुद्ध जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांबाबत मार्गदर्शन अभियानाच्या प्रभावी नियोजनासाठी कर्जत प्रशासकीय भवन उपविभागीय अधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी मंडळ स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून शिबिरांच्या आयोजनातील अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिले. सकपाळ यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग: महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १११ शिबिरे आयोजित करण्यात आली. १८ फेब्रुवारीला घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचे तात्काळ निराकरण करणे हा होता. प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा अभिलेख दुरुस्ती, अभिलेख हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, अकृषक परवानगी मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करणे तसेच गाव दप्तर अद्ययावत करणे या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तुकडेबंदी, फेरफार मंजुरी आणि सातबारा दुरुस्ती यासंदर्भातील प्रकरणांना विशेष प्राधान्य देण्यात आले. १५ दिवसांच्या नोटीस कालावधीमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे मार्गी लावण्यावर भर देण्यात येईल. तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत महसूल विभागाच्या सुमारे ९५ सेवांचे एकत्रीकरण करून उत्पन्न दाखला, विविध प्रमाणपत्रे यासाठी मदत कक्ष स्थापन करण्यात येतील. हे अभियान मार्च ते मे या तीन महिन्यांत दर महिन्याला दोन दिवस मार्च मध्ये ७,१४ आणि २५ —एप्रिलमध्ये १०,१४ व १७, तर मेमध्ये १, ८ व १५ असे प्रत्येक तालुक्यातील एका मंडळात राबविण्यात येतील. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित असून प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके व तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार आदी अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनत असून आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यास गती मिळाली आहे.