आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा २०२६
२५ वैयक्तिक पदकांसह सलग तिसऱ्यांदा पुरुष संघाचे विजेतेपद
डोंबिवली : म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले यांनी आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व कायम राखले. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा २ ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, डोंबिवली येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ९२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ६५ पुरुष महाविद्यालये आणि २७ महिला महाविद्यालये होती. एकूण १८० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला, ज्यामध्ये १३४ पुरुष आणि ४६ महिला जलतरणपटूंचा समावेश होता.
डहाणुकर कॉलेजच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २५ वैयक्तिक पदके पटकावली. यामध्ये १६ सुवर्ण, २ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. अथर्व म्हात्रे, रुपक जोशी, हृदांशु शर्मा, लक्ष परुळेकर आणि तेजस बावकर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्सने पुरुष गटाचे संघ विजेतेपद सलग तिसऱ्या वर्षी पटकावले. या कामगिरीमुळे विद्यापीठ स्तरावरील जलतरण क्षेत्रात डहाणुकर कॉलेजने आपले सातत्यपूर्ण वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
पुरुष संघ विजेतेपद:
सुवर्ण पदक – म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्स, विलेपार्ले
रौप्य पदक – अण्णा लीला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, कुर्ला
कांस्य पदक – झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर
महिला संघ विजेतेपद:
सुवर्ण पदक – विल्सन कॉलेज, चर्नी रोड
कांस्य पदक – युनिव्हर्सिटी पोस्ट-ग्रॅज्युएट डिपार्टमेंट (UPGD)
या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन जलतरणपटूंना आपले कौशल्य, शारीरिक क्षमता, सहनशक्ती, शिस्त, संघभावना आणि क्रीडावृत्ती दाखविण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विनय भोळे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आदित्य कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सलग तिसऱ्या वर्षी पुरुष संघाचे विजेतेपद आणि २५ वैयक्तिक पदकांची ही उल्लेखनीय कामगिरी म. ल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे आणि खेळाडूंच्या मेहनतीचे प्रतीक ठरली आहे.
0000
