मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार
दिवा : दिव्यातील मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, वाड्या- वस्त्या तसेच शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे तसेच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
उपक्रमादरम्यान अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, कॅमलिन ड्रॉईंग बुक यांसह लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे आणि त्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळावी, यासाठी क्रिकेट बॅट-बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन किट, कॅरम तसेच स्किपिंग रोप आदी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या नियोजनानुसार रविवारी सुतारवाडी, वाकी आदिवासी वाडी, कामत आदिवासी वाडी आणि बाईत आदिवासी वाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सोमवारी पातरशेत आदिवासी वाडी, स्थानिक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी कै. एकनाथ भगत तसेच ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष अजित भगत यांचे विशेष सहकार्य लाभले.
संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल दत्ताराम खैर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपाध्यक्ष रोहित जाधव, कार्याध्यक्ष नितीन शिवगण, सेक्रेटरी अमित गुरव, उपसेक्रेटरी रोहित खैर, मीडिया प्रमुख अभिजित गावडे व सुमित गावडे, संपर्कप्रमुख रवींद्र शिंदे तसेच सचिन गावडे, कार्तिक गोसावी, कलाप्पा चौगुले, यश खैर, रोहन खैर आणि रोशन खैर आदी सदस्य उपस्थित होते.
उपक्रमावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, स्थानिक ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडेसाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तसेच सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा तीन दिवसीय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परतीचा प्रवास केला.
