राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी
अशोक गायकवाड*
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. लोकभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्या. त्रिपाठी यांचे अभिनंदन केले. समारंभाच्या प्रारंभी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्या. त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना आणि अधिपत्र वाचून दाखविले. राष्ट्रगान, वंदे मातरम् आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शपथविधीनंतर वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपद रिक्त झाले होते. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, तसेच मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांचीही यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *