उद्योगासाठी घेतलेली जमीन मंगल कार्यालय, मंदिरासाठी देण्यास विरोध; भूखंड वाटपाच्या चौकशीची मागणी
कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा भूखंड राजस्थानमधील परप्रांतीय व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
कुडाळ एमआयडीसीचे अभियंता अविनाश रेवणकर यांच्याकडे ग्रामस्थांनी भूखंड वाटपाबाबत विचारणा केली असता, संबंधित भूखंडाचे अद्याप वाटप झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर, भूखंडाचे वाटप झालेले नसेल तर तेथे उत्खनन कसे करण्यात आले, असा सवाल वैभव नाईक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला. उत्खननाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी भूखंडावर उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले.
शासकीय जमिनीवर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वैभव नाईक आणि ग्रामस्थांनी केली. त्यानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी अवैध उत्खननाबाबत मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, कुडाळ एमआयडीसीच्या स्थापनेवेळी उद्योग आणि कारखाने उभारले जाणार असल्याने स्थानिक जमीनमालकांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी त्यांना प्रति गुंठा केवळ ४२ रुपये मोबदला मिळाला होता. मात्र, आता याच जमिनीवर उद्योग उभारण्याऐवजी मंगल कार्यालय आणि मंदिरासाठी भूखंड देण्याचा प्रकार होत असेल, तर त्याला स्थानिकांचा तीव्र विरोध राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
संबंधित भूखंडावर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची चर्चा असून, असा कार्यक्रम झाल्यास तो उधळून लावण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भूखंड वाटपाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, कुडाळ एमआयडीसीतील काही युनिट्स आणि भूखंडधारकांकडून वेळेवर भाडे भरले जात नसल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. काही युनिट धारकांकडून गैरप्रकार सुरू असून, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीला भेट देऊन कार्यालयीन कारभार आणि संबंधित तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी एमआयडीसीचे रत्नागिरी एरिया मॅनेजर संजय कसबे, मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, अतुल बंगे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *