आठही तालुक्यातील आंगणवाड्यांची स्थिती समाधानकारक
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीत समाधानकारक चित्र समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सर्व १,५३९ कार्यान्वित अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही सुविधांचे प्रमाण तब्बल १०० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण १,५३९  आंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी सर्व १,५३९ अंगणवाड्या कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणीही उपलब्ध असल्याचे या अहवालात  नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय किंवा पाण्याची सुविधा नसलेली एकही  आंगणवाडी जिल्ह्यात नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने आभिमानास्पद आणि कौतुकाची बाब आहे असे म्हणावे लागेल.
तालुकानिहाय विचार करता सावंतवाडी २४७, कणकवली २४४, मालवण २२८, वैभववाडी १४७, कुडाळ २६८, वेंगुर्ला ९७, देवगड २०७ आणि दोडामार्ग १०१  आंगणवाडी केंद्रे आहेत. या आठही तालुक्यांतील प्रत्येक  आंगणवाडीमध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा १०० टक्के उपलब्ध असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर  यांनी अलिकडेच दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील आंगणवाड्यांना भेटी दिल्या असून  पोषण आहाराची तपासणी तसेच  तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, महिला बालकल्याण अधिकारी प्रतीक उगारे हेही  अंगणवाड्यांना भेटी देऊन एकूण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत कुडाळ तालुका २६८ अंगणवाड्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर सावंतवाडी (२४७), कणकवली (२४४), मालवण (२२८), देवगड (२०७), दोडामार्ग (१०१), वेंगुर्ला (९७) आणि वैभववाडी (१४७) अशी संख्या आहे.
आंगणड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाबरोबरच स्वच्छता व सुरक्षित पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही सुविधांबाबत जिल्ह्याची आकडेवारी शंभर टक्के असल्याने सिंधुदुर्गच्या अंगणवाडी व्यवस्थेतील ही सकारात्मक बाब ठरली आहे. सिंधुदुर्गातील १,५३९ अंगणवाड्यात १०,७७२ बालके असून ६३ अंगणवाड्यांची पटसंख्या शून्य आहे. ६८१  आंगणवाड्यांमध्ये  पाचपेक्षा कमी मुले आहेत.
जिल्ह्यातील आंगणवाड्यांच्या पटसंख्येची स्थिती पाहता अनेक  आंगणवाड्यांमध्ये अत्यल्प मुले  असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल ६३  आंगणवाड्यांमध्ये एकही मूल  नाही, तर ६८१  आंगणवाड्यांमध्ये केवळ १ ते ५ मुले आहेत. जिल्ह्यात ४०१ आंगणवाड्यांची पटसंख्या ६ ते ९, तर ३३५  आंगणवाड्यांची पटसंख्या १० ते २० आहे. २० पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या ५१, तर ३० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या आठ अंगणवाड्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अत्यल्प पटसंख्या, तर काही  आंगणवाड्यांमध्ये तुलनेने अधिक पटसंख्या असे चित्र दिसून येते.
तालुकानिहाय विचार करता कुडाळमध्ये सर्वाधिक २६८ आंगणवाड्या असून तेथे २,१७८ मुले आहेत. सावंतवाडी तालुक्यात  २४७  आंगणवाड्या व १,८१८ मुले, कणकवलीत २४४  आंगणवाड्या व १,९०९ मुले , तर देवगडमध्ये २०७  आंगणवाड्या व १,५२० मुले  आहेत. मालवणमध्ये २२८  आंगणवाड्या असून ९९७ मुले आहेत.

चौकट
आंगणवाडीत ‘हिरकणी’ कक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या ओरोस  देऊळवाडा इथल्या  आंगणवाडीत तर गर्भवती मातांसाठी ‘हिरकणी ‘कक्ष आहे.या कक्षाला बरीच वर्ष झाली असून असा कक्ष असलेली ही जिह्यातील पहिलीच  आंगणवाडी.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *