गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता-बंधू
-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातली सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुलेh
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!
शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।

जगदीश खेबूडकरांनी रचलेल्या या गीताने अग्रलेखाची आज सुरुवात करण्यास कारणही तसे खासच आहे. आजपासून दै. बित्तंबातमीची सुत्रे संपादक अनिकेत जोशी सरांकडून विनम्रतेने आम्ही स्वीकारत आहोत. ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी, प्रकाश कुलकर्णी, संजीवनी खेर हे लोकसत्तातील तीन दिग्गज पत्रकार आणि बँकिंग तज्ज्ञ असलेले जयंत खेर यांनी एकत्र येऊन १९८२ साली बित्तंबातमीचे रोपटे लावले. सुरुवातीला पाक्षिक असणारे बित्तंबातमीचे पुढे साप्ताहिक झाले आणि मग अनिकेत जोशी यांनी धाडसी पाऊल उचलत त्याचे दैनिकात रुपांतर केले. वर्तमानपत्राच्या साम्राज्यावर न्यूज चॅनेलचे आक्रमण होत असताना हे धाडस करण्यासाठी अंगी सामर्थ्य लागते. विचारांवर अढळ निष्ठा लागते. अनिकेत जोशी यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि समर्थपणे चालवलेही. अनिकेत जोशी यांनी बित्तंबातमीला एकहाती वर्तमानपत्रांच्या भाऊगर्दीत वेगळी ओळख करून दिली. नवी उंची गाठून दिली. दरम्यान मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सचिवपदी मी दुसऱ्यांदा निवडून आलो आणि संघाच्या कार्याच्या निमित्ताने अनिकेत जोशी व प्रकाश कुलकर्णी यांच्याशी संपर्क आणि संवाद वाढला. ‘बित्तंबातमी’ ची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवण्याचे अनिकेत जोशी यांनी निश्चित केले. त्यासाठी त्यांनी माझी निवड केली हा मी माझा बहुमान समजतो. आजपासून ‘बित्तंबातमी’ दैनिकाच्या प्रिंटलाईनवर अनिकेत जोशींऐवजी संदीप चव्हाण असे नाव जरी छापले जाणार असले तरी वर्तमानपत्राची पवित्र ध्येय आणि धोरणे तीच राहणार आहेत. वर्तमानपत्र चालवताना मनी तेच भाव, तोच स्नेह, तोच आत्मविश्वास असणार आहे. वर्तमानपत्राची मालकी यापुढे बित्तंबातमी एसपी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असणार आहे. विचार आणि निष्ठेची रुजवात १९८२ साली या दिग्गजांनी लावली होती तीच यापुढे तेवत ठेवण्याचा प्रयत्न टीम बित्तंबातमी कडून केला जाणार आहे. अर्थात अनिकेत जोशी आणि इतर सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद बित्तंबातमी ला असणारच आहेत. २८ वर्षे सक्रिय पत्रकारितेत असतानाच ‘महाराष्ट्र वन’ हे सॅटेलाईट चॅनेल सुरु करण्याचे धाडस आम्ही केले. सॅटेलाईट न्यूज चॅनेलची मालकी असणारा पहिला मराठी माणूस ही बाब खचित सुखावणारी होती. २०१८ साली कोलकात्यात व्हॉईस ऑफ रिपब्लिक नावाचे बंगाली वर्तमानपत्रही आम्ही यशस्वीपणे चालवले. सदामंगल पब्लिकेशनच्या माध्यमातून पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांची मेजवानी रसिकांना देण्याचा प्रयत्न केला. आणि आता बित्तंबातमीच्या मालक, मुद्रक , प्रकाशक आणि संपादकाच्या नव्या इनिंगला सुरुवात करीत आहोत. आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद गृहीत धरूनच हे पाऊल उचलले आहे.
बित्तंबातमी यापुढे नव्या टेक्नॉलाजीचा अंगीकार करणार आहे. यंदाच्या वर्षात प्रिंटसोबतच डिजिटल व्यासपीठावरही बित्तंबातमीचा ठसा उमटवायचा आहे. ‘बित्तंबातमी’ ची अद्ययावत वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. ती अधिकाधिक वेगवान करण्याचा प्रयत्न यापुढे प्राधान्याने राहील. बित्तंबातमीचे युट्यूब चॅनेलही सुरु करण्यात आले आहे. यात ठाणे, मुंबई आणि रायगडमधील बातम्यांवर विशेष फोकस असेल. फेसबुक, व्टिटर आणि इंस्टाग्रामवरही बित्तंबातमीचा ठसा उमटवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या विश्वासाने १९८२ साली बित्तमाबातमी सुरु करण्यात आला आणि वाचकांनी गेली ४१ वर्ष जो विश्वास बित्तंबातमीवर ठेवला त्यास आम्ही तडा जाऊ देणार नाही. राजेंद्र हुंजे, प्रज्ञा जांभेकर-चव्हाण, स्वाती घोसाळकर, शैलेश तवटे, अशोक गायकवाड, प्रशांत शिंदे असे नव्या दमाचे शिलेदार बित्तंबातमीच्या परिवारात सामील झाले आहेत. बित्तंबातमीतील जुने सर्व पत्रकार सहकारी, जाहिरातदार, हितचिंतक यांनी या नव्या बदलावर दाखविलेल्या विश्वासाने आम्ही भारावून गेलो आहोत. अनिकेत जोशी, प्रकाश कुलकर्णी, संजिवनी खेर आणि जयंत खेर यांना अभिमान वाटावा अशी नवी उंची बित्तंबातमीला गाठून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. मायबाप वाचकांच्या पाठबळाशिवाय हे आव्हान पेलणे शक्य नाही. वाचकांच्याही अपेक्षांना खरे उतरण्याचा प्रयत्न नव्या मॅनेजमेंटकडून निश्चित केला जाईल. हाच आमचा आपणास दिलेला ‘शब्द’ असेल. गीतकार खेबूडकरांच्याच शब्दात सांगायचे झाले तर…
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!
आम्ही चालवू हा पुढे वारसा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *