शैलेश तवटे
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी पंगा घेणारे विजय शिवतारे आता ‘वेटिंग मोडवर’ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना वर्षावर बोलावून घेतले होते. पण सात तास ताटकळत ठेवून अखेर त्यांना भेटीचा वेळ दिला.
या भेटीसाठी शिवतारे हे १५० कार्यकर्ते सोबत घेऊन आले होते. अजित पवारांशी आपल्याला कसा त्रास दिला याचा पाढा आपण मुख्यमंत्र्यांकडे वाचला. त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या आहेत. संबधितांशी ते याबाबत बोलणार आहेत. यासाठी दोन दिवस मला शांत रहाण्यास सांगितले आहे. दोन दिवसानंतर आमची पुन्हा या विषयावर चर्चा होईल असे शिवतारे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर तुम्ही बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणार का, असा प्रश्न यावेळी विजय शिवतारे यांना विचारण्यात आला. त्यावर शिवतारे यांनी म्हटले की, मी गेल्या 4 दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. बारामतीमधून उमेदवारी मागे घ्यायला अजून लोकसभेचे फॉर्म भरलेले नाहीत किंव उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत नजीक येऊन ठेपलेली नाही. त्यामुळे मी बारामीत मतदारसंघातून उमेदवारी मागे घेणार की नाही, हे ठरवण्यासाठी बराच अवधी आहे. आता एकनाथ शिंदे यांना इतर लोकांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ हवा असेल. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा काय बोलतात, हे पाहावे लागेल. तेव्हा निवडक पदाधिकाऱ्यांसोबत मी पुन्हा बैठकीला येईन, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.
विजय शिवतारे काय म्हणाले होते?
मी त्यांना महायुती झाल्यानंतर माफ केले होते. मात्र अजित पवार यांचा उर्मटपण गेलेला नाही. जनता त्यांना निवडून देणार नाही. मी बारामतची लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. अजित पवारांचा बदला घेणारच असा निर्धारच विजय शिवतारे यांनी केला होता. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार असा प्रश्न आहे. मात्र, अजित पवार उर्मट आहेत, त्यामुळे लोक आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान करु असे म्हणत आहेत”, असं विजय शिवतारे यांनी बोलून दाखवलं होतं.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद वाढीस लागला. विजय शिवतारे यांनी शरद पवारांविरोधात टोकाची टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी शिवतारे यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत अजित पवार म्हणाले होते की, “विजय शिवतारे पोपटासारखा मिठू मिठू बोलाय लागलाय. तुझ बोलण किती आहे आणि तुझा आवाका किती आहे? आमचं दैवत असणाऱ्या माणसाविरोधात बोलतो. तुला यंदा दाखवतो तू आमदार कसा होतो ते. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, मी जर एखाद्याला आमदार करायचं नाही असं ठरवलं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा पराभव झाला.