घरासाठी अजून किती दिवस आंदोलन करायचे ?
माथाडी हातगाडी कष्टकऱ्यांचा सरकारला सवाल
रमेश औताडे
मुंबई : माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून ” कापड बाजार कामगार नव गृहनिर्माण समिती ” च्या माध्यमातून सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला. सरकारने अद्यापही याबाबत आश्वासना शिवाय काहीच केले नाही. सरकार अधिवेशनात काहीतरी निर्णय घेईल म्हणून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. अधिवेशन संपले, आता आचारसंहिता जाहीर होईल. आमच्या मागण्या कधी पूर्ण होणार ? घरासाठी अजून किती दिवस आंदोलन करायचे ? असे अनेक प्रश्न आंदोलनातील माथाडी हातगाडी कष्टकरी सरकारला विचारत आहेत.
कापड बाजारातील माथाडी, हातगाडी गरीब कष्टकरी कामगारांना सहयाद्री नगर, चारकोप, कांदीवली, मुंबई येथे शासनाने दिलेल्या ७ एकर मोकळया भुखंडावर कापड बाजार आणि दुकाने मंडळ यांच्या माध्यमातून प्रचलीत पध्दतीने घरे बांधून देण्याची मागणी आम्ही केली असून सरकार अद्यापही गंभीर नाही असे ऍड.धर्मराज जाधव यांनी सांगितले.
बांधकाम प्रस्तावास मंजूरी मिळावी, बांधकाम सुरु करण्याचे आदेश दयावेत, ७ एकर जागेवरील विकास आराखड्यातील इस्पितळ, मैदान, रस्ता इतर आरक्षण वगळावे, जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवर कोकण विभागाच्या आदेशानुसार कापड बाजार आणि दुकाने मंडळाला कामगारांच्या घरबांधणीसाठी बांधकामास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
२९ फेब्रुवारी २०२४ पासून आम्ही उपोषण करत असून शासनाने या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
सात एकर जमीनीवर २० वर्षापासून घरांचे बांधकाम रखडले आहे. कामगार अत्यंत हवालदील झाले आहेत. अनेक कामगार राजीनामा दिल्यामुळे घरापासून वंचित झाले आहेत. तर काही राहीलेले कामगार अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बांधकाम होण्याची वाट पहात आहेत.
0000
