ठाणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे,गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविणे, जिल्हयांना विकासाचे केंद्रबिंदू मानून जिल्हा व राज्याच्या विकासाला चालना देणे, या हेतूने उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत व उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या वतीने 13 मार्चला लॅब इंडिया ऑडिटोरियम, फेडरेशन हाऊस,ठाणे येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या परिषदेच्या माध्यमातून जिल्हयामध्ये रु.५ हजार कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये २० हजार इतके रोजगार उपलब्धी होणार आहे.
या कार्यक्रमासाठी फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री.भालचंद्र रावराणे, टीसा च्या अध्यक्षा श्रीम सुजाता सोपारकर, श्री. निनाद जयवंत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, उद्योग उपसंचालक सीमा पवार तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात उद्योग पूरक वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात उद्योग घटकांकडून गुंतवणूक होईल व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी व्यक्त केला. डिश चे संचालक श्री.देविदास गोरे व बिझक्राफ्ट चे संचालक श्री.संतोष कांबळे यांनी या कार्यक्रमात उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक सकस फूड्स च्या डॉ.विद्या क्षीरसागर आणि प्रिसिहोलचे संचालक श्री.काझी यांनी त्यांच्या व्यवसायाबाबत अनुभवकथन केले.
या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक कोकण विभाग उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ यांनी केले. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व त्याचा जिल्ह्याला होणारा फायदा, शासनाच्या विविध उद्योग पूरक योजना,धोरणे याबाबतची माहिती त्यांनी दिली. या परिषदेच्या अनुषंगाने जिल्हयातील एकूण ४७ उद्योग घटकांनी शासनासोबत सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारान्वये जिल्हयामध्ये रु.५ हजार कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये २० हजार इतके रोजगार उपलब्धी होणार आहे. या परिषदेमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी काही उद्योगांना प्रातिनिधीक स्वरुपात सामंजस्य कराराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्योगांमध्ये होणार असलेली गुंतवणूक आणि रोजगार मिळणाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे-
मे.एम.एस. रोमा बिल्डर्स- 700 कोटीची गुंतवणूक- 10 हजार कर्मचारी, मे. बाओक्सेरा फार्मा प्रा.लि.- 200 कोटीची गुंतवणूक-500 कर्मचारी, मे. लॅब इंडिया इक्विपमेंट प्रा.लि.- 100 कोटी गुंतवणूक- 500 कर्मचारी, मे. ब्रॅशलेस मोटर इंडिया प्रा.लि.- 100 कोटी गुंतवणूक-600 कर्मचारी, मे. क्रुगर वेन्टिलेटर्स-100 कोटी गुंतवणूक-300 कर्मचारी, मे. स्टारशाईन एमएफजी कंपनी प्रा.लि.- 100 कोटी गुंतवणूक-75कर्मचारी, मे. प्रिसिहोल आर्म्स् फॅक्टरी / प्रिसिहोल स्पोर्टस् / प्रिसिहोल मशीन टूल्स फॅक्टरी एक्सपान्शन- 110 कोटी गुंतवणूक-210 कर्मचारी. यावेळी आयोजित चर्चासत्रात औद्योगिक संघटना तसेच शासकीय विभागांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *