नवी मुंबईच्या 40 सफाई मित्रांना लाभ
नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमा’त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित घटकांसाठी देण्यात येणाऱ्या पीपीई किट व आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 40 सफाईमित्रांना लाभाचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान ना.श्री. नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान महोदयांनी लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत नियोजन भवनामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ठाणे जिल्हाधिकारी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री समाधान इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान महोदयांनी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 25 सफाईमित्रांना पीपीई किट आणि 15 सफाईमित्रांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.