४२वेळा रणजी करंडकावर ताबा
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
मुंबई :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवत ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. मुंबईच्या संघाने विक्रमी ४२व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. विदर्भच्या संघानेही कडवा प्रतिकार करत मुंबईला सहज विजय मिळवू दिला नाही. अक्षय वाडकर, करूण नायर आणि हर्ष दुबे यांनी मुंबईने दिलेले डोंगराएवढे लक्ष्य गाठण्याचा आटोकाठ प्रयत्न केला खरा पण मुंबईच्या शिलेदारांनीही काही शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि रणजी करंडक पटकावला. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत १०वी विकेट घेतली आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ ठरला.
पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा डाव सुरू झाला तेव्हा विदर्भचा संघ ५ बाद २४८ धावांवर खेळत होता. त्यांना विजयासाठी २९० धावांची तर मुंबईला ५ विकेट्सची गरज होती. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. वाडकरने रणजी फायनलमधील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले होते.पण नंतर ९ चौकार आणि १ षटकार लगावत १०२ धावा करणाऱ्या शतकवीराला मुंबईच्या तनुष कोटीयनने शतकी खेळी केलेल्या अक्षय वाडकरला पायचीत करत विदर्भ संघाला मोठा धक्का दिला. तनुषनंतर तुषार देशपांडेने दुबेला झेलबाद करत विदर्भाच्या आशांवर पाणी फेरले.त्यानंतर आदित्य सरवटेची विकेटही देशपांडेच्या नावे होती. तनुष कोटीयनने षटकार लगावणाऱ्या यश ठाकूरला क्लीन बोल्ड केले. नंतर अजिंक्यने शेवटच्या विकेटची जबाबदारी अनुभवी धवलवर सोपवली आणि त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने उमेश यादवला क्लीन बोल्ड करत सामना मुंबईच्या नावे केला. मुंबईने शेवटचं रणजी जेतेपद २०१५-१६ मध्ये पटकावलं होतं. मुंबईने सांघिक प्रदर्शनाच्या बळावर जेतेपद पटकावलं आहे. या हंगामात कर्णधाराची कामगिरी सर्वसाधारण राहिली पण रहाणेने अंतिम सामन्यत ७४ धावांची खेळी केली. मुंबई संघाचा स्टार खेळाडू तनुष कोटीयन याला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित केले आहे.तर युवा खेळाडू मुशीर खान याला अंतिम सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले.