ठाणे : जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याने मार्च २०१९ रोजी इमारत पाडण्यात आली. याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत बाधंण्यात येणार आहे. म्हणून पुढील तीन वर्षांसाठी स्क्वेअर फिट होम्स, एस.जी. बर्वे रोड, जि. एस.टी. भवन समोर, वागळे इस्टेट, एम.आय.डी.सी, २२ नंबर सर्कल, ठाणे- (प) येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीत जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे कामकाज वागळे इस्टेट येथील भाडेत्तत्वावर घेतलेल्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले असल्याने सर्व ग्रामस्थांनी यांची नोंद घ्यावी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व बांधकाम विभाग आहे त्याच इमारतीतून कामकाज करतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य इमारतीच्या प्रस्तावाला ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नवीन इमारतीमध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल.