विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहारावर झोड उठवून कारावास भोगणारे
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते यांचे दि. १२ मार्च रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
२२ जुलै १९४१ रोजी जन्मलेल्या प्रकाश गुप्ते यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु ऐंशीच्या दशकात अशाच प्रकारचा विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार्‍या ख्यातनाम पत्रकार प्रकाश गुप्ते यांना सुमारे तीन महिने कारावास भोगावा लागला. एका ज्येष्ठ नेत्याने प्रकाश गुप्ते आणि अभय मोकाशी यांना विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात, अशी माहिती दिली. प्रकाश गुप्ते यांनी ती बातमी प्रसिद्ध केली. परंतु ही माहिती देणार्‍या नेत्याने ‘हात’ वर केले. वर्तमानपत्राने सुद्धा प्रकाश गुप्ते यांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी कचखाऊ धोरण स्वीकारले आणि दुर्दैवाने प्रकाश गुप्ते यांना हक्कभंग प्रस्तावाला सामोरे जावे लागले. त्यांना सुमारे तीन महिने कारावास भोगावा लागला. त्यानंतर प्रकाश गुप्ते हे धाडसी पत्रकार एकटे पडले. अनेक वर्षे प्रकाश गुप्ते हे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून संघाला बातम्या बनवून देत होते. या धाडसी आणि उपेक्षित पत्रकाराला महाराष्ट्र शासनाच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळू शकला नाही. अतिशय हलाखीचे जीवन जगणार्‍या या पत्रकाराने अखेर आपली जीवनयात्रा मंगळवारी संपविली. या साहसी पत्रकाराच्या कार्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचा मानाचा मुजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *