आज १४ मार्च, आपल्या इरसाल आणि गावरान भाषेतील विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके यांचा स्मृतिदिन. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवून मराठी सिनेमाला सुवर्णकाळ दाखवणाऱ्या विनोद सम्राट दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला. त्यांचा जन्म झाला तो दिवस गोकुळ अष्टमीच्या होता, आपल्या पोटी बाळकृष्ण जन्माला आला म्हणून आई वडिलांनी त्यांचे नाव कृष्णा ठेवले. पण लहानपणापासूनच सर्व जन त्यांना दादा म्हणत पुढे त्यांचे नाव रूढ झाले. त्यांच्या मोठ्या बंधूचे निधन झाल्याने त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली त्यामुळे दादा दरमहा साठ रुपये पगारावर सेवादलाच्या बँड पथकात काम करू लागले. लहानपणापासून दादांना कलेची आवड होती. सेवादलाच्या बँड पथकात त्यांच्या कला आणखी बहरून आल्या. फावल्या वेळात प्रसिद्ध गाण्यांचे विडंबन करणे, गाण्यांना चाली लावणे, विचित्र गाणी रचणे असे उद्योग दादा करू लागले. निळू फुले, राम नगरकर यासारखे जेष्ठ कलाकारही त्या काळात सेवादलात होते. तिथेच दादांची या महान कलाकारांशी मैत्री झाली आणि ही मैत्री पुढे आयुष्यभर टिकून राहिली. दादा सेवादलाच्या बँड पथकात काम करत असल्याने त्या काळात त्यांना बँड वाले दादा म्हणूनच लोक ओळखत असे. पुढे दादांनी स्वतःचा फड काढला. गावोगावी जाऊन दादा स्वतःची कला सादर करू लागले. वसंत सबनिसांच्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. विच्छा माझी पुरी करा या वगनाट्याने दीडशे प्रयोग पूर्ण केले. त्या काळी हा विक्रम होता. या वगनाट्यामुळे दादा भलतेच लोकप्रिय झाले. गावागावांतील रसिक प्रेक्षक दादांना ओळखू लागले. याच वगनाट्यातील त्यांचे काम पाहून महान दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी त्यांना थेट चित्रपटात काम करण्याची संधी दिली. भालजी पेंढारकर यांनी त्यांना त्यांच्या तांबडी माती या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. दादांनी या भूमिकेचे सोने केले. हा चित्रपट तिकीटबारीवर हिट झाला. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर दादांनी मागे वळून पाहिले नाही. मराठी चित्रपट सृष्टीत दादा कोंडके हे सर्वत्र नाव घुमू लागले. १९७१ साली दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला सोंगाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र मुंबईतील चित्रपटगृह चालकांनी आपल्या चित्रपटगृहात सोंगाड्या न लावता तीन देविया हा हिंदी चित्रपट लावला. आपल्या पहिल्याच चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याचे पाहून दादा उद्विग्न झाले आणि त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली मग काय बाळासाहेबांचा आदेश आणि शिवसैनिकांचा चित्रपटगृहात राडा. शिवसैनिकांनी चित्रपटगृहात घातलेल्या राड्याने आणि बाळासाहेबांच्या आदेशाने सोंगाड्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. नुसताच प्रदर्शित झाला नाही तर सुपर डूपर हिट झाला. सोंगाड्या पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या. सोंगाड्या हा त्या काळातील सर्वाधिक हिट मराठी चित्रपट ठरला. सोंगाड्यामुळे मरगळलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला ऊर्जितावस्था मिळाली. तमाशापटाला कंटाळलेल्या मराठी चित्रपट रसिकांना सोंगाड्यात दादांनी आपल्या विनोदाने मनमुराद हसवले. दादांच्या विनोदाला मराठी रसिकांनी मनमुराद दाद दिली. सोंगाड्याच्या अभूतपूर्व यशानंतर दादा कोंडके यांनी आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली या चित्रपटाचे नाव होते एकटा जीव सदाशिव. सोंगाड्यामुळे दादांची लोकप्रियता तुफान वाढली होती. या लोकप्रियतेचा धसका हिंदी चित्रपट सृष्टीनेही घेतला होता. दादांनी एकटा जीव सदाशिव या चित्रपटाची घोषणा केल्यावर राज कपूर यांनी त्यांच्या मुलासाठी म्हणजे ऋषी कपूर साठी काढलेला बॉबी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. सोंगाड्या पाठोपाठ एकटा जीव सदाशिव हा चित्रपटही सुपर हिट झाला. त्यानंतर दादांनी पांडू हवालदार या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात दादांनी अशोक सराफ यांना संधी दिली. हा चित्रपटही यशस्वी ठरला मग काय त्यानंतर दादांच्या यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. तुमचं आमचं जमल, राम राम गंगाराम, बोट लावील तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, सासरचे धोतर असे दादांचे सलग चित्रपट यशस्वी झाले. सलग नऊ रौप्य महोत्सवी चित्रपट देण्याचा विक्रम दादांनी केला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. त्यांच्या यशस्वी चित्रपटात त्यांच्या इरसाल विनोदाचा जितका वाटा होता तितकाच त्या चित्रपटातील श्रवणीय गाण्यांचा देखील होता. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. आजही दादांच्या चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. दादांचे चित्रपट जितके लोकप्रिय झाले तितकेच ते वादग्रस्तही ठरले. त्यांच्या सर्वच चित्रपटांना सेन्सॉर बोर्डने आडकाठी आणली मात्र दादांनी सेन्सॉर बोर्डाच्या या दंडेली पुढे कधीही नमते घेतले नाही उलट सेन्सॉर बोर्डशी त्यांनी कायम दोन हात केले. ज्या शिवसेनेमुळे त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकले त्या शिवसेनेशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. आयुष्यभर त्यांनी शिवसेनेशी बांधिलकी राखली. १४ मार्च १९९८ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. दादांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदाच्या या सम्राटाने अशी अकाली एक्झीट घेतल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला सुवर्णकाळ दाखवणारा विनोदाचा सम्राट काळाच्या पडद्याआड गेला. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांच्यासारखा विनोद सम्राट पूर्वी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. विनोद सम्राट दादा कोंडके यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *