रमेश औताडे
मुंबई : बांधकाम कंत्राटदारांकडून बांधकाम कामगारांची नोंदणी होत नसल्याने अनेक बांधकाम कामगारांना सरकारी सवलती पासून वंचित रहावे लागत आहे. सरकारी तिजोरीत बांधकाम कामगारांच्या महामंडळाचा निधी पडून आहे त्याचा उपयोग या बांधकाम कामगारांना होत नाही . शासनाच्या विविध योजनांचा लाभ या कामगारांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बांधकामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळणे तसेच कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र नोंदणी कुठे करायची ? कशी करायची याची माहिती बांधकाम कामगाराचे नेते कॉम्रेड मधुकांत पथारीया हे वेळोवेळी देत असतात मात्र कंत्राटदाराच्या असहकार्यामुळे मधुकांत पथारिया यांच्या सहकार्याला म्हणावे तेवढे यश मिळत नाही.
नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 असावे त्या कामगारांनी मागील वर्षभरात किमान 90 दिवस बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे मात्र कंत्राटदार या 90 दिवसांमध्ये सातत्य दाखवत नसल्याने कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही.
सबके अच्छे दिन असे सांगत विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते ,इमारती अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटची बांधकाम होत आहेत. त्यामध्ये हे मजूर काम करत असताना त्यांना सरकारी योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकारने बांधकाम कामगार महामंडळ निर्माण केले आहे. मात्र घोषणा करून , महामंडळ करून सर्व कागदावरच आहे. सरकारच्या आश्वासनाने आमचे पोट भरत नाहीआमचे पोट भरत नाही असे किसन जाधव या बांधकाम मजुराने सांगितले.