लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचा दौरा करत लाखो कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ केला. भाजपला दक्षिणेत गमावण्यासारखे काहीच नाही. एक एक जागा महत्त्वाची असल्याने भाजपने तिथे हातपाय मारायला सुरुवात केली आहे. जुना मित्रपक्ष अण्णाद्रमुकशी जुळवून घेण्यासही भाजपने सुरुवात केली आहे. ते न झाल्यास द्रमुकला पर्याय होण्याची तयारी या पक्षाने केली आहे.

तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि विरोधी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) या दोन पक्षांचे राज्याच्या राजकारणावर वर्चस्व आहे. अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडली आहे. भाजपशी त्याचे बिनसले आहे. लोकसभेच्या रणामध्ये हे राज्य महत्त्वाचे आहे. कारण दक्षिणेकडील या राज्यात लोकसभेच्या ३९ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेस युतीने येथे वर्चस्व राखले आणि ३८ जागा जिंकल्या. अण्णाद्रमुकला एकच जागा मिळाली. त्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि इतर प्रादेशिक संघटनांसोबत अण्णाद्रमुकची युती होती. एव्हाना येथे विविध पक्षांनी युतीसाठी चर्चा सुरू केली आहे. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी श्रीपेरुंबदूरचे खासदार टी. आर. बालू यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या जागावाटप समितीशी चर्चा सुरु केली. दुसरीकडे, अण्णाद्रमुकने के. कृष्णसामी यांच्या पुथिया तमिझगम या पक्षाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. पुथिया तमिझगमला भाजपचा पाठिंबा आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपने नाराज होऊन अण्णाद्रमुकशी असलेली युती तोडल्यानंतर भाजप एकाकी आहे. भाजपने आतापर्यंत जी. के. वासन यांच्या तमिळ मनिला काँग्रेसशी करार करण्यास सहमती दर्शवली आहे. एस. रामदास यांच्या पट्टाली मक्कल काचीबरोबरही भाजपची चर्चा सुरू आहे. द्रमुक हा ‘इंडिया’ आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष आहे. काँग्रेसने २०१९ लोकसभा आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच्यासोबत युती केली होती. या दोन्ही निवडणुकींमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने मोठे विजय मिळवले होते. तथापि, लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना द्रमुकने अद्याप काँग्रेस किंवा विदुथलाई चिरुथिगल काची सारख्या लहान पक्षांशी जागावाटप करार करण्यास सहमती दर्शवलेली नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये काँग्रेसने नऊ जागांवर निवडणूक लढवत आठ जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, द्रमुक यांच्यात कमालीचे सामंजस्य आहे; परंतु अजूनही जागावाटप ठरलेले नाही. अर्थात द्रमुक देईल तितक्या जागा निमूटपणे पदरात पाडून घेण्याशिवाय या पक्षापुढे अन्य पर्याय नाही. स्टॅलिन यांच्या द्रमुकने भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि माकप (एम) यांना प्रत्येकी दोन जागा तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि कोंगू देसा मक्कल काची यांना प्रत्येकी एक जागा दिली आहे. २०१९ मध्ये, भाकप आणि माकपने चार जागा जिंकल्या होत्या. आययूएमएल आणि केडीएमके यांनी प्रत्येकी एक जागा लढवली, त्यात ते जिंकले. इधिया जननायागा कच्ची आणि कोंगुनाडू मक्कल देसिया काची हे धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी म्हटल्या जाणार्‍या राज्यस्तरीय गटाचे इतर सदस्य आहेत. त्यांनी दोन जागा लढवून जिंकल्या. द्रमुकच्या कनिमोझी यांनी २०१९ मध्ये निवडणूक जिंकली होती. ही जागा त्यांच्यासाठी सोडली जाऊ शकते. कनिमोळी यापूर्वी दोन वेळा राज्यसभेच्या खासदार होत्या. भाजपला रोखण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये ‘इंडिया’ आघाडीची स्थापना करण्यात आली. तथापि ‘इंडिया’ आघाडीला अद्यापही समाधानकारक जागावाटप जमलेले नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, दिल्लीसह पाच राज्यांमध्ये आम आदमी पक्षासोबत आणि महाराष्ट्रात मित्रपक्षांसोबत आघाडी केल्यानंतर गेल्या महिन्यात परिस्थिती बदलत असल्याचे दिसते.
अण्णाद्रमुक आणि भाजपदरम्यान गेल्या वर्षी मतभेद झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी अण्णाद्रमुकचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन आणि त्यांचे गुरू सी. एन. अन्नादुराई यांच्यासह माजी आणि विद्यमान नेत्यांवर वारंवार हल्ला केल्यानंतर त्यांच्यातला वादंग वाढत गेला. भाजपने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षांशी संपर्क साधला आहे; परंतु सध्या त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. खरे तर पक्षाचे ज्येष्ठ नेते के. पी. मुनुसामी यांनी भाजपला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उमेदवारी देण्याचे थेट आव्हान दिले आहे. अण्णाद्रमुक नेत्याकडून निर्मला सीतारामन यांना मैदानात उतरवण्याचे आव्हान देण्यात आले असले तरी त्या हे आव्हान पेलण्याची शक्यता नाही. अण्णाद्रमुकने पुथिया तमिझगम पक्षाशी संपर्क साधला आहे. त्याने १९९८ मध्ये निवडणुकीत पदार्पण केल्यापासून या पक्षाने लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीामध्ये किरकोळ चुणूक दाखवली आहे. भाजप ऐतिहासिकदृष्ट्या राज्यात नॉन-परफॉर्मर राहिला आहे. कारण राज्यात द्रविड चळवळीचे वर्चस्व आहे. तिथे भाजपचे मतदान तीन टक्कयांपेक्षा कमी आहे. परिणामी, येथे पंतप्रधान मोदी खूप सक्रिय झाले असून वर्षभरात चार दौरे केले आहेत. त्यांनी पक्षाचा अण्णाद्रमुकपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये असताना त्यांनी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा वारसा सांगत द्रमुकवर हल्ला केला. जयललिता यांच्यावर टीका केल्यामुळेच अण्णाद्रमुक भाजपपासून दुरावला होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मोदी यांच्या चौथ्या दौर्‍यात भाजपने तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या शोधावर लक्ष केंद्रित केले आहे. एमजीआर आणि जयललिता यांच्यावर केलेली टीका विसरून आता मोदी यांनीच जयललिता आणि एमजीआर यांचे कौतुक केले; परंतु अण्णाद्रमुकचा राग अजून कमी झालेला नाही. अण्णाद्रमुकने ‘स्वस्त राजकारण’ या शब्दांमध्ये मोदी यांच्या भाषेचे वर्णन केले आहे. यासंदर्भात बोलताना अण्णाद्रमुकचे नेते डी. जयकुमार म्हणाले की आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये परतरणार नाही. दुसर्‍या बाजुने पाहिले असता लक्षात येते की भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूच्या राजकीय परिदृश्यात पाऊल ठेवण्यासाठी ऐतिहासिक आव्हानांचा सामना केला आहे. आता पक्षाने तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या सहयोगी भागीदाराशिवाय राजकारण सुरू केले आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि अखिल भारतीय द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) यांचे पारंपारिक वर्चस्व असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अण्णाद्रमुकने त्याग केला. भाजपलाही तमिळनाडूमध्ये अद्याप कोणत्याही महत्त्वपूर्ण पक्षाची साथ मिळालेली नाही. पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी युती बांधण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केले जात आहे.
तमिळनाडूमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये तीन टक्कयांपेक्षा कमी मतसंख्या असताना भाजप जी. के. वासन यांच्या तमिळ मानिला काँग्रेससारख्या संभाव्य मित्रपक्षांशी सहकार्य करत आहे. एस. रामदास यांचा पट्टाली मक्कल कच्ची, विजयकांत यांचा देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम तसेच डॉ. के. कृष्णसामी यांच्या पुथिया थामिझगम या प्रमुख मित्रपक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात हे करत असताना पक्षाला अण्णाद्रमुकसोबत समेट होण्याची आशा आहे. या घडामोडींदरम्यान, भाजपच्या राज्य युनिटने आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि, राज्यात पक्ष रुजवण्याचे काम सोपवण्यात आलेल्या के. अण्णामलाई यांच्यासारख्या नेत्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे. याच सुमारास केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांची राज्यसभा खासदार म्हणून पुनर्नियुक्ती करणे हे तमिळनाडूच्या राजकीय परिदृश्यात अस्तित्व टिकवून ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न अधोरेखित करते. भाजप विविध आव्हानांचा सामना करत निवडणुकीची तयारी करत असताना अण्णाद्रमुककडून थेट आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे ही स्थिती असताना कुणी मित्र मिळाले नाहीत तर स्वबळावर निवडणूक लढवून तमिळनाडूमध्ये किमान दहा टक्के मताधार मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आजघडीला राज्यात द्रमुकला सार्थ पर्याय दिसत नाही. असा पर्याय बनण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या कामी पक्षाला कितपत यश येते, हे येता काळ सांगेलच.
(अद्वैत फीचर्स)

राज्यरंग

राही भिडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *