राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक उद्या १५ मार्च २०२४ पासून नागपुरात सुरू होत असून या बैठकीत परिवर्तनाच्या पाच योजना चर्चिल्या जाणार असल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. संघाचे शताब्दी वर्ष येत्या विजयादशमीपासून सुरू होत असल्यामुळे या प्रतिनिधी सभेतील चर्चा आणि निर्णयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिवर्तनाच्या या पाच मुद्द्यांमध्ये स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी गैरराजकीय सामाजिक संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. साधारणतः या दरम्यान भारतात विविध राजकीय आणि सामाजिक विचारधारा सक्रिय झाल्या होत्या. त्यातील बहुतेक सर्व विचारधारा काळाच्या ओघात विस्मृतीत तरी गेल्या आहेत किंवा अगदी औषधालाच जेमतेम शिल्लक राहिलेल्या आहेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची विचारधारा ही गत ९९ वर्षात फक्त वाढलीच नाही तर समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात रुजली आणि फोफावली सुद्धा. आज संघाशी संबंधित असलेल्या विविध संघटना विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आणि या संघटना देखील संघ विचार सर्वदूर पोहोचवत आहेत.
संघाची मुळात स्थापना झाली ती स्वातंत्र्यलढ्यात हिंदूंचे सक्रिय संघटन पुढे यावे या हेतूने. मात्र त्यावेळी आघाडीवर असलेल्या इतर प्रमुख संघटनांनी त्यांना विरोधच केला. तरीही अशा विरोधाला तोंड देत संघ वाढला. कारण समाजात राष्ट्रीय भावना जागृत करणे आणि सुजाण सुसंस्कृत समाज घडवणे इतकेच मर्यादित ध्येय संघाने डोळ्यासमोर ठेवले होते. संघाने संघ म्हणून कधीही सत्तेचे राजकारण केले नाही किंवा इतरही क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. मात्र प्रशिक्षित सुसंस्कारित कार्यकर्ते विविध क्षेत्रात पाठवले आणि सर्वत्र संघ विचार रुजवला. त्यामुळेच येत्या विजयादशमीला संघ ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
शताब्दी वर्षात संघाने ज्या पाच क्षेत्रात काम करायचे ठरवले आहे, त्यात सर्वप्रथम स्वदेशीचा मुद्दा घेतला आहे. स्वदेशी हा फक्त संघाचाच मुद्दा आहे असे नाही महात्मा गांधींनी देखील स्वदेशीचे आग्रह धरला होता. मात्र नंतरच्या काळात आपल्या देशात इम्पोर्टेड चे वेड अगदी पंतप्रधानांपासून तर झोपडीतल्या नागरिकापर्यंत प्रत्येकाला लागले आणि स्वदेशी पूर्णतः बाजूला पडली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वदेशीचे जागरण ही स्वागतार्ह बाब आहे. तसेही देशात मोदी सरकार आल्यापासून स्वदेशीला जास्त उत्तेजन दिले जाते आहेच.
संघाच्या विचारमंथनातील दुसरा बिंदू हा नागरिक कर्तव्य असा असणार आहे. हा बिंदू देखील स्वागतार्हच म्हणावा लागेल. आपल्या देशात सर्वसामान्य नागरिक सर्वात आधी हक्काचा विचार करतो. मात्र कर्तव्याचे पालन कोणीच करत नाही. कायदे, नियम, प्रथा, परंपरा या धाब्यावर बसवत खुंटीला टांगून ठेवायच्या आणि मनमानी करत वागायचे हे आपल्या देशात प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी सांगायचे की नागपूर शहरात बिना लाईटचे सायकल चालवत पूर्ण शहरात फिरलो तरी मला पोलीस पकडणार नाही यावरून माझी प्रतिष्ठा ठरते. म्हणजेच मी किती कायदा मोडू शकतो यावर मी प्रतिष्ठित की अप्रतिष्ठित हे ठरते. आज हा प्रकार सर्वत्र रुढ झालेला दिसतो. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांसोबतच कर्तव्याचीही जाणीव करून देणे आणि कर्तव्याचे पालन करायला लावणे ही आजची गरज आहे. समाज जीवनात परिवर्तन आणण्यासाठी संघाने उचललेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य मानावे लागेल.
संघाच्या चिंतनातील तिसरा बिंदू हा पर्यावरणाचा आहे. आज फक्त देशातच नव्हे तर जगभरात पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे या मुद्यावरही चर्चा आणि कार्यवाही अपेक्षित आहेच. आम्ही विकास करतो खरा पण तो करताना पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे कुठेतरी थांबायलाच हवे. या दृष्टीनेही संघाने पुढाकार घेतला हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
आज देश एकविसाव्या शतकात पोहोचला आहे. तरीही जाती जमातीतील भेद हा कायम आहे. त्यावरून संघर्षही होतो. अनेकदा तो टोकाला जातो. हा मुद्दा लक्षात घेता सामाजिक समरसता ही आजची गरज आहे. संघाने त्यांच्या स्थापनेपासूनच सामाजिक समरसतेला प्राथम्यक्रमाने महत्त्व दिले आहे. संघ व्यवस्थेत जातीभेद पाळला जात नाही ,असा दावा केला जातो. तो खराही आहे. आज देश एकविसाव्या शतकात पुढे जात असताना जातीभेद संपून जातीभेद विरहित भारतीय समाज कसा घडवता येईल या दृष्टीने संघाचे हे प्रयत्न निश्चीतच विचार करण्याजोगे म्हणावे लागतील.
भारतात प्राचीन काळी वसुधैव कुटुंबकम ही परंपरा होती. इथे संयुक्त कुटुंब पद्धती होती. फक्त आपल्याच कुटुंबातले नाही तर नात्यातले इतर इतकेच काय तर परिचित स्नेही अशा सर्वांना परिवारात सामावून घेतले जात असे. परिवारातील प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असायचा.मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात हळूहळू परिस्थिती बदलत गेली. संयुक्त कुटुंब पद्धती बाजूला सारून न्यूक्लिअर फॅमिली सेटअप पुढे आला. आता तर कुटुंब पद्धतीच मोडीत काढली गेली आहे. लग्न न करताच लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना पुढे आली आहे. अजूनही अशा विविध गोष्टी पाश्चात त्यांच्या अंधानूकरणामुळे आपल्या देशातही रुजल्या आहेत. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा संपून फक्त माझा स्वार्थ इतकाच विचार केला जातो आहे.हे प्रकार दूर करून आपण जे काही कुटुंब आज आहे, त्यांच्यात संवाद कसा होईल आणि त्यातून समाजाची जडणघडण कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठीच कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. संघ त्या बाबतीतही पुढाकार घेतो आहे ही निश्चित अभिनंदनीय बाब आहे.
या प्रमुख मुद्द्यांवर तर संघ प्रतिनिधी सभा बैठकीत विचार मंथन होईलच. त्याचबरोबर देशातील इतर समस्या आणि आव्हाने यांच्यावरही चर्चा होईल हे नक्की. यात या विचारमंथनातून जे अमृत पुढे येईल ते निश्चितच भारतीय समाज जीवनाला नव संजीवनी देणारे ठरावे अशी अपेक्षा करायला हरकत नाही. प्रतिनिधी सभेच्या कार्यवाहीला बित्तंबातमीच्या हार्दिक शुभेच्छा…