४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा
सुशांत कदमचे दमदार शतक
ठाणे : सुशांत कदमच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बिनेट कम्युनिकेशनने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचा तब्बल ११८ धावांनी पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. २३३ धावांचा पाठलाग करणाऱ्या डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसला ११८ धावांवर गुंडाळत बिनेट कम्युनिकेशनने आपला विजय निश्चित केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सुशांतला चांगली साथ देणाऱ्या दिपक भोगले आणि सिद्धार्थ घुलेने संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. सुशांतने १०२ धावा ९९ चेंडूत १२ चौकार आणि एक षटकार ठोकून पूर्ण केल्या. दिपकचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. सिद्धार्थने २३ धावा बनवल्या. या डावात संकेत पांडेने तीन, अजिंक्य धुमाळ आणि आदित्य निकमने प्रत्येकी एक गडी बाद केला. अर्धशतक हुकलेल्या दिपक आणि सिद्धार्थने गोलंदाजीतही छाप पाडताना प्रत्येकी तीन गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. डब्ल्यूएनएसच्या संकेत पांडेने ३७ आणि आदित्य निकमने ३० धावा बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : बिनेट कम्युनिकेशन : ३५ षटकात ६ बाद २३३( सुशांत कदम १०२, दिपक भोगले ४९, सिद्धार्थ घुले २३, संकेत पांडे ७-४५-३, अजिंक्य धुमाळ ५-३६-१, आदित्य निकम ६-३३-१) विजयी विरुद्ध डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस : २२.५ षटकात सर्वबाद ११८ ( संकेत पांडे ३७, आदित्य निकम ३०, दिपक भोगले १.५ – ५ -३, सिद्धार्थ घुले ७ – ३२-३, सागर मुळेय ५-३१-१, भाविक पटेल ५-१-२२-१).