माथेरान : स्वतःच्या व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी श्रमिक हातरीक्षा चालकांनी खडतर परिश्रम केल्यानंतर त्यांना हातरीक्षा सारख्या गुलामगिरी मधून अल्पावधीतच सुरू होणाऱ्या ई रिक्षाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार असल्याने जे खरोखरच या व्यवसायात पूर्वापार रुळलेले आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे.हातरीक्षा हे येथील मुख्य वाहतुकीचे साधन आहे तर घोडा हे पर्यटकांना सैर करणारे एक हौशी वाहन आहे.ह्या दोनच साधनांचा वापर करून पर्यटकांना सेवा उपलब्ध केली जात आहे.परंतु याठिकाणी ई रिक्षा सारखा महत्वपूर्ण प्रकल्प सुरू झाल्यावर जे स्थानिक भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या घोड्याच्या व्यवसायावर आपली आणि कुटुंबाची गुजराण करत आहेत अशांना पुढे आगामी काळात व्यवसाय मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटक बहुतेक याच ई साधनाचा वापर करण्याची शक्यता असून हौशी पर्यटक घोड्याचा उपयोग पॉईंट्स ची सैर अथवा रायडिंग साठी जाऊ शकतात. मुख्यत्वे घोड्यांना दस्तुरी नाक्यापासून गावात, हॉटेल पर्यंत पर्यटकांना ने आण करण्यासाठी मोठया प्रमाणात उत्पन्न मिळत असते. याच दस्तुरी मुळे परिसरातील व्यावसायिक सुध्दा तग धरून आहेत. स्थानिक घोडेवाल्याना इथे शेती अथवा कंपन्या वा शासकीय नोकरी नसल्याने नाईलाजाने घोड्याच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे एवढेच नव्हे तर काही युवक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन सुध्दा झटपट पैसा मिळणाऱ्या या व्यवसायात आपले पाय घट्ट रोवून आहेत. शक्यतो ई रिक्षांची संख्या वाढल्यावर अर्थातच एकूण ९४ ई रिक्षांना परवाने देण्यात येणार आहेत त्यामुळे या सेवेस कुणी आडकाठी आणली नाही तर निश्चितच सारासार विचार करून हे ई वाहन पॉईंट्स कडे पर्यटकांची सैर घडवून आणण्यासाठी कूच करणार नाहीत.दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत आणि जे दूरवर राहणारे बंगल्याचे माळी कामगार आहेत त्यांना ने आण करण्यासाठी दूरवरच्या बंगल्यापर्यंत जाऊ शकतात असे संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून समजते. भविष्यात ई रिक्षामुळे पर्यटन क्रांती घडणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु शासनाने ज्या स्थानिक घोडेवाल्याचे हातावर पोट आहे अशांना काहीतरी कायमस्वरूपी व्यवसाय निर्माण होण्यासाठी प्रयत्न केल्यास सर्वांनाच उत्तम प्रकारे उपजीविकेचे साधन प्राप्त होऊ शकते असे जाणकार मंडळींमधून बोलले जात आहे.