अनिल ठाणेकर
ठाणे : भारतीय सेंट्रल रेल्वेमधील नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी नवीन पेन्शन योजना रद्द करा, रेल्वे वसाहती दुरुस्त करा, हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुख सुविधा व तीन महिन्यासाठी औषधं मिळावे, २५ हजार रिकाम्या जागा त्वरित भराव्यात १४/२ काळा कानून आणू नये या व इतर महत्त्वांच्या मागण्यांसाठी १९ मार्च २०२४ रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील १८ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून मोर्चा नेऊन मुंबई मंडळ कार्यालयावर प्रचंड निदर्शने केली.
याप्रसंगी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांनी निदर्शकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन पेन्शन योजना अन्यायकारक असून, जुन्या पेन्शन योजनेनुसार कामगारांना मूळ पगाराच्या अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे. कामगार भरती न झाल्यामुळे, आहे त्या कामगारांवरती कामाचा ताण वाढतो, तरी रिकाम्या असलेल्या २५ हजार जागा त्वरित भराव्यात. घरभाडे भत्ता ३० टक्के घेता, तर नादुरुस्त रेल्वे वसाहती ताबडतोब दुरुस्त कराव्यात, रेल्वे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कामगारांना चांगली वागणूक द्यावी, ५० टक्के महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट करावा या व इतर अनेक रेल्वे कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यावर ताबडतोब तडजोड करावी अन्यथा रेल्वे कामगार प्रचंड आंदोलन करतील असा स्पष्ट इशारा आम्ही या सभेतून देत आहोत. आम्हाला संपाची हाऊस नाही. परंतु कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास नाविलाजाने रेल्वे कामगारांना आंदोलन करावे लागेल. याप्रसंगी नॅशनल रेल्वे मजदुर युनियनच्या अध्यक्षा कामाक्षी बागलवाडीकर आणि ईसीसी सोसायटीच्या अध्यक्षा करुणा गायकवाड यांनी अध्यक्षिय भाषण केले, तर आभार आर. के. मलबारी यांनी मांनले. या आंदोलनामध्ये युनियनचे झोनल सेक्रेटरी पी. जे. शिंदे व मुख्यालय व मंडळाचे पदाधिकारी तसेच मध्य रेल्वेतून 20-25 हजार कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी जुनी पेन्शन योजना रद्द करा, कामगार एकजूटीचा विजय असो, कॉ. वेणू नायर जिंदाबाद, हम सब एक है, अशा प्रकारच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा परिसर रेल्वे कामगारांनी दणाणून सोडला.