बुलढाणा : गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून निवडणूक रोख्यांमधून चंदा गोळा करणाऱ्या भाजपाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप सातत्याने हिंदुत्वाच्या नावाने बोलत असते. मात्र, यांच्याकडे आहे तरी काय? देशप्रेम सांगत असाल, तर आम्ही सगळा इतिहास काढू. भाजपचे बापजादे सुद्धा स्वातंत्र्यलयात नव्हते अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की तुमच्याकडून शिकायच तरी काय? गद्दारी? भाजपने अनेकांना गद्दार केले. दोन पक्ष फोडून आलो सांगतात याची लाज वाटली पाहिजे. हिंदुत्वाच्या वेडापायी आम्ही निवडून देत होतो याचीच लाज वाटते असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे पण माझ्याकडे जनसंपत्ती
त्यांनी पुढे सांगितले की ज्या शिवसेनेने तुम्हाला सत्तेची गादी दाखवली त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. भाजपवाले स्वातंत्र्य लढ्यात कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं? गद्दारी का अशी विचारणा केली. ते म्हणाले की त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे. ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार खासदार केले होते त्याच गद्दारांना आता माझा शिवसैनिक या मातीत गाडणार असल्याचे ते म्हणाले. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करता, फक्त थोडे दिवस थांबा, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपच्या भूलथापांच्या नादी लागू नका
सिंदखेडराजामधील सभेमध्येही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की मला तुम्ही कुटुंबप्रमुख मानलं. मी सांगितलेलं ऐकलं म्हणून कोरोना काळात आपण वाचू शकलो. आताही सांगतोय भाजपच्या भूलथापांच्या नादी लागू नका. हुकुमशाहीला आजच गाडून टाका असे ते म्हणाले. मी तुम्हाला तळमळीने सांगतो यावेळी चूक करू नका. गद्दारीला मते देऊ नका, समोर हुकूमशाहीचं संकट असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याला मार हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.
तर गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत पाडावंच लागेल
मिंध्यांना शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र इकडे ओरबाडला जात असताना तुम्ही दिल्लीश्वरांच्या पायासमोर लोटांगण घालताय? ‘जय जिजाऊ, जय शिवराय‘ हे नातं काय आहे हे दाखवायचं असेल, तर गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत पाडावंच लागेल. समोर कितीही भला मोठा शत्रू असला, तरी आपला राष्ट्राभिमान लाचारीसारखा त्यांच्या पायावर वाहून टाकायचा नाही, असे ते म्हणाले.