जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे
ठाणे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी ठाणे जिल्ह्यात किमान 60 हजार इतक्या अधिकारी / कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात येते. निवडणूक पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासकीय कार्यालये व महामंडळे, अनुदानित शाळा/महाविद्यालये व विनाअनुदानित/स्व-अनुदानित शाळा/महाविद्यालये, बँका या आस्थापनांचा सहभाग असल्याशिवाय हे राष्ट्रीय काम पूर्ण होऊ शकत नाही.
यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया दि.4 जून 2024 रोजी पूर्ण होईपर्यंत आपल्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांना दीर्घ मुदतीच्या सुट्टीवर सोडू नये व मुख्यालय सोडण्याची परवानगी देऊ नये. अधिकारी/कर्मचारी यांच्या अभावी निवडणुकीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांनी घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी सर्व आस्थापनांच्या विभागप्रमुखांना दिल्या आहेत.