लोकशाही बळकट करण्यासाठी स्वागतयात्रा करणार नवमतदारांना आवाहन

ठाणे : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये व नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असे आवाहन या स्वागतयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी दिली. तसेच या यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी नमूद केले.
नववर्ष स्वागतयात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून आज (20 मार्च 2024) महापालिकेत अतिरिक्त्‍ आयुक्त्‍ 1 संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तनय दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
9 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता श्रीकोपिनेश्वर मंदिरापासून स्वागतयात्रेस सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजीमार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहिल या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागतयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्ण्वाहिका उपलब्ध करावी. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनेही सदरचा परिसर स्वच्छ करुन घेण्याबाबतच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या.
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, तसेच एप्रिल, मे मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईंमध्ये मतदान करणेबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे. तसेच महापालिकेच्यावतीने शिक्षणविभाग, आरोग्य, प्रदुषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे. वाढता उन्हाळा लक्षात घेता उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याबाबत ठाणे महापालिकेने हिट ॲक्‌शन प्लॅन तयार करण्यात आला असून याची माहिती प्रदुषण विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथातून देण्याच्या सूचनाही संबंधितांना या बैठकीत देण्यात आल्या.
श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागतयात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, तीन पेट्रोलपंप मार्गे हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळीनाका, हरिनिवास सर्कल व समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी दिल्या.
श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून निघणारी ही मुख्य स्वागतयात्रा असून शहरातील विविध भागातून 14 उपयात्रा निघणार आहेत. या उपयात्रांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे व त्या ठिकाणीही आवश्यक त्या सोईसुविधा महापालिकेच्यावतीने पुरविण्यात याव्यात असेही अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *