मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करावा. तसेच त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते. या वेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजन, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, समितीचे समन्वयक अधिकारी तथा महापालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी नियुक्त स्वीप समितीचा कृती आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नियमितपणे बैठक होईल, असेही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले. या वेळी समितीचे समन्वयक महाजन, डॉ. दळवी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित विविध विभागप्रमुखांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध सूचना केल्या.
‘नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करा’
जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. याबरोबरच नवमतदारांच्या नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती द्यावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे. त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *