अशोक गायकवाड

रत्नागिरी : आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या कालावधित विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आचारसंहितेच्या कालावधित होणाऱ्या संशयास्पद बँक व्यवहारांवर बँकांनी लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची अल्प बचत सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पैशाचा गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचललेली आहेत. यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशाची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँकांनी माहिती घ्यावी. बँका दररोज संशयास्पद व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवतील, असेही त्यांनी स्पष्ट कळवतील. जिल्ह्यातील बँकांकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. संशयास्पद व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. बँकांनी आपापल्या बँकेच्या पातळीवर समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत आणि या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून, याबाबतची माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी असेही, त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *