अनिल ठाणेकर

ठाणे : भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकवेळेला संकेत दिले की, मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. यामुळे महायुतीमध्ये मनसेचा समावेश होत असताना कुठेही वैचारिक वाद होणार नाहीत, असे मत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
१९ तारखेलाच दिल्लीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे शिर्ष नेतृत्व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई येथील ताज लॅण्ड इन हॉटेल येथे बैठक झाली. असे संकेत आहेत की मनसेची महायुतीमधील समावेशाची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील. मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४५ प्लस लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे जे घटक पक्ष एनडीए मध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील त्यांचे स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. महायुतीतील सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचे जागावाटप होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील. मनसे जर महायुतीतमध्ये येत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे स्वागतच करेल. कोणती राजकीय भूमिका याच्या आधी मनसेने घेतली असेल, हे महत्वाचे नाही. आता एकच लक्ष आहे की मनसेचे महायुतीमध्ये सामिल झाल्यानंतर ४५ प्लस लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रातुन निवडून द्यायच्या आहेत. यामुळे मनसेचे महायुतीत स्वागत आहे. या बैठकीत अजित पवार साहेब नसले तरी या प्रक्रियेची संपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिली जाते. तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मनसेशी चर्चा सुरु आहे आणि आम्ही त्यांचे स्वागतच करतो. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण या तीनही लोकसभेच्या जागा व पालघर जिल्ह्यातील एक जागा यावर मनसेचा, महायुतीतील सहभागाबद्दल महायुतीतील उमेदवाराला फायदाच होईल. स्वप्न कधी साकार होतात कधी भंगही पावतात. विधानसभा निवडणूक अद्याप सहा महिने दूर आहे. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक येईल, त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळेला कशी असेल त्यापद्धतीने वाटाघाटी होतील.आता महायुती समोर लक्ष्य आहे, येणाऱ्या पाच टप्यामधील महाराष्ट्रामधील ४८ लोकसभेच्या जागा, या ४८ जागांमधील ४५ प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणे हा सर्वात पहिला संकल्प महायुतीतील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकवेळेला संकेत दिले की, मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. यामुळे महायुतीमध्ये त्यांना घेत असताना कुठेही वैचारिक वाद होणार नाहीत, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.
चौकट
मुंबईला आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की शिवतारे या विषयाला फार महत्व देऊ नका. मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील. एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरु मारायचे नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही राजकीय प्रगल्भता आहे. कुठला विषय कुठर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा. महायुतीला कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल असे कुठलेही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *