विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धा शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत आयोजित
ठाणे : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२३-२४, एन. के. टी. सभागृहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरोग्य असो की शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठी पालकांनी देखील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी भारतीय संस्कृती प्रमाणे आहार घेण्यात यावा. मोबाईलचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी करण्यात यावे. शारिरीक सुदृढतेसाठी व्यायाम, मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कलेला सादर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले.
तालुका स्तरावरील विजेता विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला. समूहगान (लहान), समूहगान (मोठा), वक्तृत्व (लहान), वक्तृत्व (मोठा), नाटक सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले आहे.
यावेळी उप शिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, गटशिक्षणाधिकारी भिवंडी संजय अस्वले, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, एन. के. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडीया सैलियन, परीक्षक प्रतिक्षा बोर्डे, परीक्षक माधुरी बागडे, परीक्षक स्वाती कदम, परीक्षक मेधा दिवेकर तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. गंगाराम ढमके व मनोहर मडके यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले आहे.