काँग्रेसची पहिली यादी जाहीर
मुंबई ; महाराष्ट्र विकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरु असतानाच आज काँग्रेसने आपली सात उमेदवारांची पहिली यादी जाहिर केलीय. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंद यांना तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव कलगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेले वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. ‘राष्ट्रवादी’ने त्यांना 2002 साली विधान परिषदेवर नियुक्त केले, पण 2009 मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2014 साली दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चव्हाण यांचा 2019 मध्ये भाजपाकडून पराभव झाला. चव्हाण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटीलांची उमेदवारी जाहीर
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे. सांगली हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने तिथून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.