नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी इतकेच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून सत्तेत कायम राहणाऱ्या आपने मोदींविरुध्द ‘फेस टू फेस’ ची लढाई सुरु केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं तीव्र आंदोलने सुरु केली आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणजे मोबाईलवरील व्हॉटस अँपचा मोदींविरुध्द वापर असणार आहे. त्यासाठी आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. ज्यांचा मोदींना विरोध आहे त्या सर्व देशवासियांना आपले डीपी बदलण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा एक स्पेशल फोटो आपने जाहिर केला आहे.

आपच्या नेत्या आणि प्रवक्त्या आतिषी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “अरविंद केजरीवाल यांची प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी आज संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर एक डीपी कॅम्पेनची सुरुवात आम्ही करत आहोत. आज दुपारी ३ वाजल्यापासून आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आपले डीपी बदलणार आहेत

यावेळी डीपीसाठी त्यांनी एक फोटो देखील पत्रकार परिषदेत सादर केला. यामध्ये तुरुंगाच्या गजांआड असलेले केजरीवाल दिसत आहेत तसेच त्यावर ‘मोदी का सबसे बडा डर केजरीवाल’ असा संदेश लिहिला आहे.

आतिषी पुढे म्हणतात, देशातील सर्व लोकांनाही मी आवाहन करु इच्छिते की जर तुम्ही अरविंद केजरीवालांचे समर्थक असाल, तुम्ही हुकुमशाही विरोधात आवाज उठवू इच्छित असाल, जर देशातील लोकशाही तुम्ही वाचवू इच्छित असाल, तसेच जर तुम्ही पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत, हा संदेश देऊ इच्छित असाल तर माझं सर्व देशवासियांना आवाहन आहे की हा फोटो त्यांनी डीपीवर ठेवावा. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसं ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सर्व ठिकाणी हा डीपी ठेवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *