अनिल ठाणेकर
ठाणे : जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे विश्वसनीयरीत्या कळते.
जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि विविध सामाजिक कार्यातून आपली लोकहितवादी प्रतिमा निर्माण केलेले निलश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात नुकतेच जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी केंद्रीय मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे हे काँग्रेस पक्षाकडून लढविण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. पण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अजून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये जागेवरून निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे. यामुळे निलेश सांबरे यांची उमेदवारी यामुळे जाहीर होऊ शकलेली नाही. राहुल गांधी यांनी नुकत्याच काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या मार्गावर निलेश सांबरे यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले होते. या यात्रेदरम्यान निलेश सांबरे आणि राहुल गांधी यांची भोजनाच्या निमित्ताने भेट होऊन चर्चा झाल्याचेही बोलले जाते. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे वृत्त आहे. यामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटल्यास काँग्रेसची उमेदवारी निलेश सांबरे यांना निश्चितच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु काँग्रेसची उमेदवारी जर मिळाली नाही तर अपक्ष म्हणून, ना. कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निलेश सांबरे यांचा निर्धार कायम आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी निलेश सांबरे यांचे चांगले व्यक्तिगत संबंध आहेत. नुकत्याच एका पुरस्काराच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निलेश सांबरे यांचा सत्कार करताना, निलेश सांबरे यांचे जाहीर कौतुक केले होते. परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री ना.कपिल पाटील यांच्याशी निलेश सांबरे यांचे विळा-भोपळ्याचे नाते आहे. गेल्या दहा वर्षात ना. कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे भिवंडीतील मतदारांचा खासदार कपिल पाटील यांच्यावरील विश्वास पार उडालेला आहे. फक्त पक्ष आणि चिन्ह याकडे पाहून मतदार, खा. कपिल पाटील यांना आता मतदान करणार नाहीत, अशी जाहीर टीका निलेश सांबरे यांनी केली आहे. जनतेला जनतेमध्ये जाऊन काम करणारे, जनतेचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व हवे आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जनसेवेचे प्रचंड काम उभे करणारे जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हेच यावेळी भिवंडीचे खासदार होतील, अशी आशा निलेश सांबरे समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
कोकणातील सातही लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटनेच्या मार्फत निलेश सांबरे यांनी सामाजिक काम उभे केले आहे. यामुळे निलेश सांबरे यांना काँग्रेसमधून भिवंडीतून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कोकणातील सातही लोकसभा मतदारसंघात फायदा होऊ शकतो. तर निलेश सांबरे यांना भिवंडीतून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास आणि निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूकीला उभे राहिण्यास कोकणातील सात लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटनेचे मतदार कोणाविरुद्ध मते देतील आणि त्याचा फटका कोणत्या पक्षाला बसेल याबाबत राजकीय पक्षांमध्ये भितीचे वातावरण आहे. निलेश सांबरे यांची पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी खास जवळीक होती परंतु नंतर त्यांच्याच गटाच्या आमदाराने सांबरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटनेमार्फत कोकणात स्वबळावर मोठे काम उभे केले आहे. यामुळे सर्वच पक्षांना निलेश सांबरे यांची गंभीर घ्यावी लागत आहे.
चौकट
निलेश सांबरे यांनी विक्रमगड नगरपालिकेवर दोनदा सत्ता मिळवली होती. सामान्य जनतेचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोकण विभागातील गरिबीची जाणीव असल्याने त्यांनी विक्रमगड, वाडा, जव्हार, ठाणे, रत्नागिरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळावी, म्हणून करिअर मार्गदर्शन शिबिर, स्पर्धा परीक्षा, मोफत कोचिंग क्लासेस आदी उपक्रम राबवले आहेत. ठाणे, विक्रमगड, जव्हार, वाडा, भिवंडी, पालघर आदी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी अशा उच्च शिक्षणाची दारे खुली करून देऊन विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे. अनेक विकासकामे त्यांनी पाठपुरावा करून सुरू केली आहेत.