मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उभा करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करणार असल्याचे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आज जाहिर केले. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून इतर समाजाच्या उमेदवारांच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहिर केल्यामुळे तेथील भाजपा उमेदवार भारती पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे कळते.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत आंतरवली सराटी येथे बैठक पार पडली. यात लोकसभा निवडणूक लढविण्यावर समाजबांधवांकडून एकमत झाले.पाचशेहून अधिक उमेदवार उभे केल्यास, मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रस्थापितांना होणार आहे. त्यामुळे समाजातूनच अपक्ष उमेदवार उभे केले जावेत, तसेच राखीव मतदारसंघात समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला.

30 मार्चपर्यंत शिक्कामोर्तब

या निर्णयानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार कोण असेल? याविषयी चर्चा रंगत आहे. दरम्यान, मराठा समाजाकडून चार ते पाच नावे समोर येत असून, त्यातील एका नावावर 30 मार्चपर्यंत शिक्कामोर्तब केले जाणार आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाला जो उमेदवार जाहीर पाठिंबा देणार, त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार म्हणून करण गायकर, चंद्रकांत बनकर, डॉ. सचिन देवरे, विलास पांगारकर यांची नावे पुढे आहेत. पुढील दोन दिवसांत नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नावांवर एकमत झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जरांगे-पाटील यांना सादर केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *