ठाणे: होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात. त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करू या. असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान काढले. त्यामुळे राजकारण नको फक्त होळी आणि हाेळीचा आनंद साजरा करू या, असेही ते म्हणाले. या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळे जळून खाक होऊ दे. तसेच राज्यातल्या जनतेला सुखाचे, समाधानाचे दिवस येऊ दे, असेही ते म्हणाले.
नैसर्गिक रंगांचा वापर करीत होळी धुळवड साजरी करा, असं आवाहन करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. टेंभी नाक्यावर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कै. आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती. हीच परंपरा आता मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु ठेवली आहे. लवकरच लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर होईलच. पण आज फक्त आणि फक्त होळी.. असे बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्याने टाळले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसबीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यासही रंग लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकारी, पोलिस, पत्रकार आदी मंडळींना रंग लावून रंगाची उधळण केली. याप्रसंगी राज्यातल्या जनतेला, शेतकरी, कष्टकरी- कामगार समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू दे, त्यांना सुख आणि समाधान होऊ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. तसेच राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय, असे बोलून होळी ही पर्यावरणपूरक असावी. केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.