पुणे : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवतील.

शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील उपस्थित राहणार आहेत. आढळराव यांच्याबरोबर त्यांचे समर्थक कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी खासादर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आढळराव यांच्या नावाला विरोध दर्शविला होता.

अजित पवार यांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील आणि आढळराव यांच्यात दिलजमाई झाली होती. त्यामुळे आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार मंगळवारी आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आढळराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *