विरार : मार्चअखेरीस येणाऱ्या गुड फ्रायडे (ता. २९) पासून रविवार (ता. ३१)पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनावणे यांनी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडून स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करून मुद्रांक शुल्क भरून खरेदी दस्तांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे या वर्षीदेखील १ एप्रिल २०२४ पासून स्थावर मिळकतीच्या रेडिरेकनरच्या दरात वाढ होणार असल्यामुळे मार्चअखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करत आहे. या कारणामुळे मार्चअखेरीस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीदेखील पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे.
सर्वसामान्य जनतेने या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरून करावी, असे आवाहन पालघर जिल्ह्याचे सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी डी. पी. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *