नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून

बित्तंबातमी विशेष

अविनाश पाठक

भाग २

प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यासाठीच सोयीचे व्हावे आणि गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून आमच्या सरकारने इलेक्टोरल  बॉण्ड्स आणले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. मात्र भविष्यात राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्यासाठी पैसा उभा करता यावा यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून नवा सक्षम पर्याय शोधणे गरजेचे आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

इंडिया टुडे समूहाच्या बिझनेस टुडे या नियतकालिकाच्या वतीने गुजरात येथील गांधीनगर येथे आयोजित बँकिंग अँड इकॉनोमिक समिट मध्ये एका प्रकट मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळी बिझनेस टुडे चे संपादक राहुल कवल सिद्धार्थ जहराबी आणि सौरव मुरलीधर यांनी प्रश्न विचारून गडकरी यांना बोलते केले.

ज्यावेळी इलेक्टोरल बॉण्ड्स प्रकरणात माहिती देताना गडकरी म्हणाले की प्रत्येक राजकीय पक्षाला पैसा हा लागतोच. फक्त राजकीय पक्षाचा नाही तर सर्वच संघटना आणि व्यावसायिकांनाही पैसा लागतो, हे स्पष्ट करताना तुम्ही एखादा चांगला कार्यक्रम आयोजित करता, मात्र तो सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुम्हालाही प्रायोजक लागतोच ना? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपस्थितांना निरुत्तर केले. राजकीय पक्षांना निवडणूक निधी लागतो आणि त्यात अनेक गैरप्रकार होतात अशा तक्रारी असल्यामुळे आमचे सरकार सत्तेत आल्यावर तत्कालीन मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेतील समितीने इलेक्टोरल बॉण्ड्स हा उपाय शोधला होता. काही परकीय देशांमध्ये तर निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रचाराचा खर्च तिथले सरकार करते. मात्र आपल्याकडे सरकार करत नसल्यामुळे आम्ही हा पारदर्शक उपाय सुचवला होता. त्या समितीत मी देखील होतो. आम्ही विचार करून योग्य तो मार्ग शोधला होता. मात्र आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आपण जास्त बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

रिकाम्या पोटी तत्त्वज्ञान शिकवता येत नाही असे स्वामी विवेकानंद सांगितले होते, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की त्याचप्रमाणे पैशाशिवाय राजकीय पक्ष काहीही करू शकत नाही. निवडणूक लढवून सरकार आणायचे असेल आणि राजकीय पक्षाला त्यांच्या संकल्पनेतला कार्यक्रम राबवायचा असेल तर त्यांना पैसा लागणार हे नक्की. त्यामुळे असा पैसा उभारण्यासाठी विद्यमान पद्धतीतील त्रुटी दूर करून कोणता तरी पारदर्शक आणि वैध मार्ग निश्चित होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय देखील सुयोग्य असा पर्याय सुचवू शकेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आपल्या कार्यकाळात आपण आतापर्यंत ५० लाख कोटींची कामे केली. अनेक पायाभूत सुविधांची उभारणी केली त्यासाठी पैसा हा प्रश्न होता. मात्र मी  पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपची संकल्पना राबवत लोकांकडून पैसा घेऊन त्यांना सुविधाही दिल्या. असे सांगताना मी या देशात बीओटी म्हणजेच बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या संकल्पनेचा जनक असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्याजवळ पैशाची कमी नाही. आपण जर चांगली सेवा देणार असू तर लोक विश्वास ठेवून पैसाही देतात  असे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते बांधणीसाठी इनव्हिट या व्यवस्थेमार्फत पैसा उभा करण्यासाठी केंद्र सरकारने बॉंड्सचा इशू जाहीर केला होता. या इशूची मुदत सात दिवसाची होती. मात्र पहिल्याच दिवशी हा इशू सातपट ओव्हर सबस्क्राईब झाला. शेवटी आमच्या खात्याच्या आर्थिक सल्लागारांनी मला बोलावून तू इशू सात दिवसाऐवजी एकाच दिवसात संपवावा असा सल्ला देऊन निर्णय घ्यायला लावला. हा किस्सा सांगून गडकरी म्हणाले की जर आपण जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करून पैसा उभा करायचा ठरवला तर पैसा उभारणे कठीण नाही. आता आपण याच माध्यमातून पैसा उभारताना देशातल्या गरिबांकडून पैसा घेऊन त्यांना श्रीमंत करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांच्या बॉण्डवर आपण दरवर्षाला घसघशीत व्याज देणार असून निवृत्त व्यक्तींना दरमहा पेन्शन सारखे व्याज त्यांच्या घरी कसे देता येईल हा प्रयत्नही आम्ही करणार आहोत असे त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

देशातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये बँकांच्या असहकारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर सर्व संबंधितांना सोबत घेऊन आम्ही मार्ग काढला आणि ९० टक्के बुडीत कर्ज वाचवून आम्ही मार्गी लावले याकडे गडकरींनी लक्ष वेधले. या सर्वच प्रकरणांमध्ये ९० टक्के समस्या या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे झाल्या होत्या हे सांगून या सर्वांना एकत्र बसवून आम्ही मार्ग काढला आणि अडलेली कामे मार्गी लावली. परिणामी तीन लाख कोटींचे बुडीत कर्ज आम्ही वाचवू शकलो असे त्यांनी अभिमानाने सांगितले. कोणत्याही समस्येवर मार्ग निघू शकतो मात्र त्यासाठी निर्णय घेण्याची तयारी ठेवावी लागते.अधिकारी बरेचदा निर्णयच घेत नाहीत. त्यामुळे प्रकरण चिघळते आणि बँकिंग इंडस्ट्रीचा अनुभव असा आहे की माणूस थोडा जरा वाईट अवस्थेत आला की त्याला जास्तीत जास्त गड्ढ्यात कसे घालता येईल हेच बघितले जाते. ही मानसिकता बदलायला हवी आणि सकारात्मक भूमिकेतून विचार व्हायला हवा अशी सूचनाही त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य यावेळी गडकरींनी सांगितले की मला काम करणारी माणसे आवडतात, तेच माझे तत्व असल्याचे ते म्हणाले.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बनवताना बोलावलेल्या निविदांमध्ये धीरूभाई अंबानींची निविदा ३६०० कोटी रुपयांची होती. मात्र मी हे काम १८०० कोटीत होईल असा दावा करून ती निविदा अडकवली. त्यावेळी धीरूभाई माझ्यावर नाराज झाले होते. त्यावेळी सरकार जवळ फक्त पाच कोटी रुपये होते. मात्र आम्ही जनसहभागातून पैसा उभा केला. राज्य शासनाची एमएसआरडीसी ही कंपनी उभी केली आणि हा रस्ता दोन वर्षात सोळाशे पन्नास कोटी रुपयात बांधला. तो रस्ता आजही व्यवस्थित आहे. ज्यावेळी हे धीरूभाईंना कळले त्यावेळी त्यांनी बोलावून माझे अभिनंदन केले, आणि नितीन मी तुझ्यासमोर आज हरलो आहे अशी कबुलीही दिली, अशी आठवण गडकरींनी यावेळी सांगितली. इफ देअर इज अ विल देअर इज ए वे, अँड इफ लेअर आज नो विल, लेअर विल बी ओन्ली कमिटी डिस्कशन अँड सर्वे, नो रिझल्ट, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

आजही पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी आम्ही पैसा कसाही उभा करू शकतो, हे स्पष्ट करताना नागपुरात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते महावितरणला विकले, आणि त्यापासून नागपूर महापालिकेला दरवर्षाला तीनशे कोटी रुपयाचे उत्पन्न आम्ही देतो आहोत याकडे गडकरींनी लक्ष वेधले. मथुरा येथील लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाबाबतही त्यांनी माहिती दिली.

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सरकार बनवण्याची संधी मिळाली आणि आपणही पुन्हा मंत्री झालात तर आपले अपूर्ण राहिलेले काम कोणते पूर्ण करणार? असा प्रश्न विचारला असता मला या देशातील खेडी समृद्ध करायची आहेत आणि खेड्यातून शहराकडे गेलेल्या नागरिकांना परत खेड्यात आणून त्यांना समृद्धीचे जीवन जगण्याची व्यवस्था करून द्यायची आहे असे आपले स्वप्न असल्याचे गडकरी म्हणाले. आज देशातील कचरा आणि शेतीतील कचरा तसेच इतर निरुपयोगी वस्तू यांच्यापासून इंधन आणि विद्युत निर्मिती होऊ शकते. त्यातून आजचा शेतकरी जो अन्नदाता आहे तो ऊर्जादाताही बनवू शकतो. या परिस्थितीत आपण आज इंधन परदेशातून आयात करतो आहोत ते थांबवून आपण इंधन निर्यात करू शकतो. त्याच बरोबर स्वच्छ भारत अभियान देखील राबवले जाते.सुदैवाने या सर्व प्रकल्पांबाबत माझी आणि पंतप्रधानांची चर्चा झाली असून तेही याबाबत सकारात्मक असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. यातूनच आत्मनिर्भर भारत बनेल आणि भविष्यात भारत जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून पुढे येईल हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *