रंगाच्या उधळणीबरोबरच संगीतात रमली तरुणाई
ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील भगवती मैदानावर अपूर्व उत्साहात संगीतमय धूलिवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पारपंरिक व नैसर्गिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. या उत्सवाला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदू संस्कृतीतील प्रमुख सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरे करण्यावर विश्वास सामाजिक संस्थेकडून प्राधान्य दिले जाते. त्यानुसार यंदा नौपाड्यातील भगवती मैदानावर धूलीवंदनाच्या दिवशी सकाळी ११ पासून रंगोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार संगीताची मैफल सादर करण्यात आली. धूलीवंदनानिमित्ताने प्रसिद्ध गायक-गायिका सारिका सिंग, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंग, सई जोशी, प्रशांत मापेरी, निलेश निरगुडकर, सतीश भानुशाली यांच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गीतांवर तरुणाईने ठेका धरला. रंगाची मुक्त उधळण करीत नागरिकांनी धूलीवंदन साजरे केले.
विश्वास सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष संजय वाघुले यांच्याबरोबरच भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, भाजपा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गौरव अंकोला, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, विश्वास सामाजिक संस्थेचे सदस्य अमित वाघचौरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मेहनत घेतली.