देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. या निवडणुकीत सर्वात लक्ष्यवेधी ठरणारी लढत राहणार आहे ती महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात सकृतदर्शनी नणंद विरुद्ध भावजय अशी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात ती काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.

बारामती हा मतदारसंघ देशाच्या राजकारणावर कायम प्रभाव टाकणारे ज्येष्ठ माजी काँग्रेसी आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आधी बारामती विधानसभा मतदारसंघ, मग बारामती लोकसभा मतदारसंघ, असे कायम आपल्याकडेच बारामती ठेवणाऱ्या शरद पवारांनी २००९ पासून या मतदारसंघात आपली मुलगी सुप्रिया सुळे हिला निवडून आणलेले आहे. यावेळीही या मतदारसंघातून महाआघाडीतर्फे सुप्रिया सुळे निवडणूक लढणार हे नक्की झाले आहे. दस्तूरखुद्द शरद पवारांनीच तशी घोषणा केलेली आहे. आणि प्रचारालाही सुरुवात झाली आहे.

मात्र या वेळचा प्रचार थोडा वेगळा होतो आहे. त्याला कारणही तसेच आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीतर्फे उमेदवार कोण हे अद्याप जाहीर झाले नसले तरी त्यांच्या विरोधात त्यांची वहिनी म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांची बायको सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार हे जवळजवळ नक्की झाले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार हे नक्की आहे.

आतापर्यंत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात इतर पक्षांचा दुसरा कोणीतरी उमेदवार उभा केला जायचा. यावेळी प्रथमच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच विरोधाला उभे राहिली आहे. याला कारण ठरला आहे तो अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष, आणि या संघर्षातून अजित पवारांनी २ जुलै २०२३ रोजी पक्षात केलेले बंड.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्या वेळच्या महायुतीतील शिवसेनेने मतदारांचा कौल नाकारत भाजपशी असलेली युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाआघाडीचे सरकार सत्तारूढ झाले होते. हे सरकार शिवसेनेतच झालेल्या बंडामुळे जून २०२२ मध्ये कोसळले आणि महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तारूढ झाले. परिणामी आधी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते झाले.

अजित पवार वर्षभर विरोधी पक्ष नेते होते. मात्र २ जुलै २०२३ रोजी त्यांनी आपल्या सोबत चाळीस आमदार आणि काही खासदार घेऊन पक्षाला रामराम ठोकला. लगेचच ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी आणि त्यांच्यासह इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. इथून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात खुलेआम संघर्ष सुरू झाला.

नंतरच्या काळात अजित पवारांनी आपल्या काकांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासाठी आपल्यावर कधी कधी आणि कसा कसा अन्याय केला याचा जाहीररीत्या पाढाही वाचला. त्यावर महाराष्ट्रात बरेच चर्वितचर्वणही झाले. अजित पवार हे महाराष्ट्रातील एक धाडसी आणि बेधडक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असणारे राजकारणी आहेत. मात्र त्यांना पुढे येण्यासाठी शरद पवारांनीच अडथळे आणल्याचा त्यांचा दावा होता. अनेक प्रसंग तपासले तर अजित पवारांच्या ताब्यात तथ्यही आढळून येत होते. ते बघता एकूणच शरद पवार हे कन्या प्रेमाने आंधळे झाले होते, आणि तिला राजकारणात पुढे नेण्याच्या धडपडीत आपल्या लायक असलेल्या पुतण्यावर सातत्याने अन्याय करीत सुटले होते. मध्यंतरी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यावेळी अजित पवारांच्या मातोश्रींनीही आपल्याला अजित मुख्यमंत्री झालेला बघायला आवडले असते असे विधान वयाच्या ८६ व्या वर्षी केले होते. त्या माऊलीची वेदना बघता शरद पवारांनी कन्याप्रेमाने आंधळे होऊन अजित पवारांवर किती अन्याय केला असेल याची तीव्रता ही लक्षात येते.

अजित पवारांनी बंड केल्यावर ते महायुतीत आले आणि मधल्या काळात अजित पवारांसोबत असलेला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निकाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला. तेव्हापासून अजित पवारांचाही उत्साह वाढला. अजित पवारांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायचे ठरले. त्यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

आतापर्यंत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे निवडणुकीला उभे राहिले म्हणजेच अर्ज दाखल केला की निश्चित असायचे. त्यांना फारसा प्रचार करायची गरज नसायची.” बस नाम ही काफी है” अशी त्यांची परिस्थिती होती. मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही. हे इतरांच्या तर लक्षात आले असेलच. पण शरद पवारांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे कधी नव्हे ते शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार व्यवस्थेत स्वतः लक्ष घालताना दिसत आहेत. सध्या मतदारसंघात ठिकठिकाणी ते मतदारांचे मेळावे घेत आहेत आणि सुप्रिया सुळे यांना विजयी करा हे सांगत आहेत.

इथपर्यंत ठीक होते, पण शरद पवारांनी त्याच्याही पुढे जात आपल्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनाही कधी नव्हे ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरवले आहे. आपले पुतणे म्हणजेच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांना सहकुटुंब पत्रपरिषद घ्यायला लावली .त्यात श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नींनी अजित पवार कसे चुकले हे सांगण्याचाही प्रयत्न केला. शरद पवारांच्या भगिनीही आपल्या भाचीच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या आहेत. आजच सुप्रिया सुळे यांच्या आणखी एक वहिनी त्यांचा प्रचार करत असल्याची बातमी कानावर आली आहे. हे बघता हळूहळू शरद पवार त्यांच्या सर्व कुटुंबीयांना प्रचारासाठी उभे करणार आणि अजित पवार तसेच सुनेत्रा पवार यांची भावनिक कोंडी करण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट दिसते आहे.

प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालते म्हणतात. त्यानुसार शरद पवारांनीही कुटुंब प्रचारात उतरवण्याची खेळलेली खेळी देखील क्षम्य म्हणता येईल. मात्र नैतिकतेच्या दृष्टीने ते कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा. अर्थात अजित पवार हे देखील आता सर्व पाश तोडून मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे काकांविरुद्ध लढताना ते इतर विरोधकासोबत जसे लढायचे तसेच लढणार आणि सुनेत्रा पवारांना विजयी कसे करता येईल यासाठी जीवाचे रान करणार यात शंका नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत नसले तरी राजकीय सगेसोयरे त्यांना साथ द्यायला पुढे आले आहेत. तिथेही राजकारण खेळून कधी विजय शिवतारे तर कधी हर्षवर्धन पाटील यांना विरोधात बोलायला लावले जाते आहे. विजय शिवतारे यांना तर निवडणुकीच्या मैदानातच उतरवण्यात येते आहे.

असे असले तरी महाराष्ट्रातील मतदार आता सुज्ञ झाला आहे. त्याला राजकारणातले डावपेच कळू लागले आहेत. नीर क्षीर विवेकाने विचार करण्याची त्याची आता क्षमता निर्माण झाली आहे. चांगले काय आणि वाईट काय हे ठरवून मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे.

नणंद विरुद्ध भावजय असा होत असलेला हा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला जाणार आहे. त्याच वेळी कधी नव्हे ती शरद पवारांनी सर्व नातलगांना प्रचारात उतरवून अजित पवारांची भावनिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न हा देखील दखलपात्र ठरणार आहे. इतिहास याची नोंद घेईलच हे पक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *