अशोक गायकवाड

रायगड : जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील बामनोली येथील चार केंद्र, वरसोली येथील सहा केंद्र, चेंढरे येथील दहा केंद्र, अलिबाग येथील सहा मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची पूर्व तयारी जोमाने सुरु आहे. विविध पातळ्यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड लोकसभा मतदार संघातील १९२-अलिबाग या विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई सांळुखे आदी उपस्थित होते.

जावळे म्हणाले भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील बामनोली येथील चार केंद्र, वरसोली येथील सहा केंद्र, चेंढरे येथील दहा केंद्र, अलिबाग येथील सहा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *