मुंबई : काँग्रेस देशासाठी लढतेय, आम्ही काही खुर्चीसाठी लढत नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र लढ्यातला सहभाग आणि योगदान सर्वांना माहिती आहे. काँग्रेस इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशांमध्ये सत्तेत राहिलीय. काँग्रेसने या देशांमध्ये संविधानिक पायमुळे मजबूत केली. त्यामुळे खुर्चीची भीती आम्हाला कोणीही दाखवू नये. आमची लढाई देशाच्या हितासाठी आणि लोकशाहीसाठी आहे. असे म्हणत खासदार संजय राऊतांनी सांगलीच्या जागेवरून काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खुर्चीची भीती आम्हाला कोणीही दाखवू नये
महाविकास आघाडीची आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित नसणार आहे. त्यामुळे सध्यासुरू असलेल्या अनेक चर्चेंना स्वतः नाना पटोले यांनी पूर्णविराम दिला आहे. प्रचाराच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने आपण प्रत्यक्ष उपस्थित न राहता वर्चुअल पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. सांगलीच्या जागेवरून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका करत आज भाष्य केले होते. त्यावरही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना टोला लगावला आहे. काँग्रेसच्या एका जागेसाठी देशाचे पंतप्रधान पद घालवणार का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता, यावर खुर्चीचे भीती आम्हाला दाखवू नका, काँग्रेस कायम देशासाठीच लढत आली असल्याचे भाष्य नाना पटोले यांनी करत राऊतांच्या त्या टीकेला उत्तर दिले आहे.
आज जे ओके देश विकून देश चालवत आहेत, देशाला कर्जबाजारी केलेले आहे. सिरम सारख्या इन्स्टिट्यूट कडून कोरोना सारख्या महामारी मध्ये 50 कोटी घेऊन लोकांना इंजेक्शन देऊन त्यांना कॅन्सर आणि हार्ट अटॅकने मारण्याचे काम सरकार करत आहे. अशा सरकारला समर्थन करण्याचं काम कोणी करत असेल तर तो त्यांच्या प्रश्न आहे. मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगितले पाहिजे की ज्या जागा आपण जिंकू शकतो त्याच जागा आपण घेतल्या पाहिजेत. असे देखील नाना पटोले म्हणाले.
आघाडीचा धर्म पाळून जागावाटप
लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्यात सर्व पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अशातच आज काँग्रेसच्या बैठकीत माहत्वपूर्ण निर्णय होणे अपेक्षित आहे. सांगलीच्या जागेवरून महायुती मध्ये अद्याप रस्सीखेच कायम असतांना यावर नाना पटोले यांनी भाष्य करत या जागेबात आज चर्चा होणार असल्याचे सांगितले आहे.
जोपर्यंत आघाडी मध्ये कोणतीही चर्चा होत नाही, तोपर्यंत त्या जागेबद्दल परस्पर काही जाहीर करता येणार नाही. सहमतीने हे सर्व निर्णय घ्यायचे असतात. त्यालाच आघाडीचा धर्म म्हणतात. त्याला पुन्हा ओपन करून उद्धव ठाकरे साहेबांनी पुनर्विचार करावा. भिवंडीच्या जागेवर सुद्धा शरद पवार साहेबांनी ती जागा काँग्रेसला द्यावी यासंदर्भातली आमची भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले.
