मुंबईनजीकच्या रुग्णांना दिलासा मिळणार
मुंबई : जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा रुग्णालय संलग्नित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये लवकरच नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
जी.टी. रुग्णालयाचे १०० विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकाची पूर्तता करण्यासाठी जी.टी. रुग्णालयबरोबरच कामा रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबरोबरच कामा रुग्णालय अधिक अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी कामा रुग्णालयामध्ये नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये शरीरशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, रोगनिदानशास्त्र, स्त्रीरोग शास्त्र आणि बालरोग शास्त्र हे नऊ नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांसाठी आवश्यक असणारे विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अन्य कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
कामा रुग्णालयामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असले, तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर व रायगडमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या रुग्णांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.