ठाणे : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत या करारासाठी सात मिटिंग झाल्या असून, इंडियन पोर्ट असोसिएशनने ४ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या पाचही महासंघाच्या राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे कडाडून विरोध केला असून, केंद्र सरकारच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी निदर्शने केली.
मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन, फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./ एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २७ मार्च २०२४ रोजी जेवणाच्या सुट्टीत कर्नाक बंदर येथे कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. याप्रसंगी ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, गोदी कामगारांचा वेतन करार आत्तापर्यंतच्या प्रथेनुसार मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करून केला पाहिजे. सरकार व मालक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आपण ओळखले पाहिजे. आपणांस लढल्याशिवाय काही मिळणार नाही, त्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज आहे. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, अधिकाऱ्यांपेक्षा कामगारांना जास्त पगार मिळता कामा नये, ही सरकारची अट चुकीचे आहे. गोदी कामगारांना मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करून १७ टक्के पगारवाढ मिळालीच पाहिजे. सरकारने पगार वाढीसाठी घातलेल्या अटी मागे घेतल्या पाहिजेत. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी विजय कांबळे, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे सचिव उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मीनास मेंडोसा, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, शीला भगत, अहमद काझी, मारुती विश्वासराव, मनीष पाटील, संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे, बापू घाडीगावकर, फिलिप्स आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.