नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याने आम आदमी पक्षाकडून या अटकेविरोधात देशभरात आंदोलनं करून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. आता विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रणशिंग फुंकणार आहे. केजरीवाल यांना झालेल्या अटकेला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीतील रामलिला मैदानामध्ये एक मोठी सभा आयोजित करण्यात येणार आहे.
या सभेसाठी विरोधी पक्षांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. मात्र या सभेला केवळ २० हजार लोकांनाच उपस्थित राहता येईल, अशी अट पोलिसांनी घातली आहे. हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा, असं या सभेचं मुख्य घोषवाक्य असणार आहे. ही सभा ३१ मार्च रोजी होणार असून त्यात इंडिया आघाडीचे अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, कल्पना सोरेन, चंपई सोरेन, सीताराम येच्युरी, भगवंत मान, डी. राजा, दीपांकर भट्टाचार्य, जी. देवराजन, हे नेते या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आळी होती. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सीबीआय भ्रष्टाचार निवारण अधिनियमांतर्गत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पैसा उभा करण्यासाठी दिल्लीमध्ये मद्य धोरण तयार केले. त्यामधून दक्षिणेतील लॉबीला फायदा पोहोचवण्यात असा आरोप करण्यात आला आहे.