गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने तळ ठोकून बसलेल्या नक्षलवावाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवावाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा डाव उधळला

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ काही नक्षलवादी तळ ठोकुन असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता काल 27 मार्चच्या रात्री पोलीस आणि नक्षलवावाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. कालांतराने पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर या नक्षलवावाद्यांनी अंधाराच्या फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र आज पहाटे या घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात घातक स्फोटके आणि इतर साहित्य आढळून आले आहे.

24 तासातली नक्षल विरोधातील मोठी कारवाई

छत्तीसगडच्या बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर चिप्पूरभट्टी जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यानंतर आज पुन्हा गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत गडचिरोली पोलिसांनाही मोठे यश आले आहे. प्राप्त माहिती नुसार, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा  घातपात करण्याचा उद्देशाने कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 किलोमीटर अंतरावर  आणि जारावंडी पोस्टे पासुन दक्षिण- पुर्वेस 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकुन असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली.

मोठ्याप्रमाणात नक्षल साहित्यही केली जप्त

या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे 8 पथक आणि सीआरपीएफच्या 1 क्युएटीसह या जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेत तात्काळ कारवाई सुरू केली. दरम्यान, जंगल परिसरात शोध मोहिम सुरु असताना माओवाद्यांनी अचानक सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्या गोळीबारास अभियान पथकानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. काल 27 मार्चच्या रात्री सहा वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही चकमक रात्री साडे अकरा पर्यंत तर पुन्हा आज पहाटे साडेचार पर्यंत सुरू होती.

या चकमकी दरम्यान चकमकीमध्ये माओवाद्यांनी अभियान पथकावर बीजीएलचाही मारा केला. परंतु अभियान पथकाने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अभियान पथकाचा वढता दबाव पाहुन अंधाराचा फायदा घेऊन माओवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, आज पहाटे या घटनास्थळी सर्च मोहीम राबवली असता या ठिकाणी अनेक घातक शस्त्र आणि इतर साहित्य पोलिसांना जप्त करण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *