मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं माजी आमदार आणि शिंदे कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं तो म्हणाला.
तुम्ही दिलेली जबाबदारी मी जबाबदारीने पार पाडेन
गोविंदा म्हणाला, तुमचे धन्यवाद तर देतोच मात्र, तुम्ही दिलेली जबाबदारी मी जबाबदारीने पार पाडेन. कला आणि संस्कृतीची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर मी स्वत:ला धन्य समजेन. मी विरारपासून बाहेर पडलो आणि आज संपूर्ण जगात प्रसिद्ध झालो. जगात झगमगणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्राची भूमी महत्वपूर्ण आहे. संतांची भूमी आहे. आपल्या देशात चित्रपट असो किंवा संस्कृती आहे, ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मला वाटतय 10 वर्षांपूर्वी दक्षिण मध्यसाठी भाषण केले होते. आता मी भाषण देतोय ती सत्य व्हावी, असंही गोविंदाने नमूद केलं. आता मुंबई फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्या कृपा होती, असंही गोविंदाने स्पष्ट केलं.