राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे
अनिल ठाणेकर
ठाणे : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? , याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले.
जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा , तो काय होणार अजित पवारांचा? , असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण, पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसेकाय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्क॔टाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटाॅपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला.
विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली. तर , रचना वैद्य यांनी, रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते.
